27 वर्षे, 3 अंतराळ मोहिमा, 9 स्पेस वॉक अन् अंतराळात 608 दिवस… आकाशाहून उंच भरारी घेणाऱ्या सुनीता विल्यम्स NASA मधून निवृत्त

हिंदुस्थानी वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांनी 27 वर्षांच्या गौरवशाली आणि ऐतिहासिक कारकि‍र्दीनंतर ‘नासा’मधून निवृत्ती घेतली आहे. 27 डिसेंबर, 2025 रोजी त्या अधिकृतरित्या निवृत्त झाल्याची माहिती ‘नासा’ने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

सुनीता विल्यम्स (वय – 60) मानवी अंतराळ मोहिमांमधील एक अग्रगण्य नाव आहे. अंतराळ स्थानकावरील त्यांच्या नेतृत्वाने भविष्यातील शोधमोहिमांना आकार दिला असून पृथ्वीच्या खालच्या कक्षेतील व्यावसायिक मोहिमांचा मार्ग मोकळा केला आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञानातील त्यांच्या कार्यामुळे चंद्रावरील ‘आर्टेमिस’ मोहिमेचा आणि मंगळाच्या दिशेने जाणाऱ्या प्रवासाचा पाया रचला गेला आहे. त्यांच्या विलक्षण कामगिरीमुळे येणाऱ्या पिढ्या मोठ्या स्वप्नांचा पाठलाग करण्यासाठी प्रेरित होतील. त्यांच्या निवृत्तीबद्दल त्यांचे अभिनंदन आणि नासा व देशासाठी दिलेल्या सेवेबद्दल आभार, असे ‘नासा’चे प्रशासक जारेड आयझॅकमन म्हणाले.

नासामधील 27 वर्षांच्या सेवाकाळामध्ये सुनीता विल्यम्स यांनी एकूण 608 दिवस अंतराळामध्ये व्यतीत केले. नासाच्या इतिहासातील अंतराळवीरांमध्ये हा दुसरा सर्वात मोठा कालावधी आहे. नासाच्या बोईंग स्टारलाइनर आणि स्पेसएक्स क्रू-9 मोहिमेदरम्यान त्यांनी अंतराळवीर बुच विल्मोर यांच्यासह 286 दिवस व्यतीत केले. अमेरिकन अंतराळवीराचा हा सहावा सर्वात लांब सिंगल स्पेसफ्लाईट प्रवास ठरला.

सुनीता विल्यम्स यांनी 3 अंतराळ मोहिमा केल्या असून 9 स्पेस वॉक केले आहेत. त्यांनी एकूण 62 तास 6 मिनिटांचे स्पेस वॉक केले. महिलांमध्ये सर्वाधिक वेळ स्पेस वॉक करण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे. तसेच अंतराळात मॅरेथॉन धावणारी पहिली व्यक्ती म्हणून सुनीता विल्यम्स यांचे नावही इतिहासात नोंद झालेले आहे.

सुनीता विल्यम्स यांनी पहिल्यांदा 2006 मध्ये ‘डिस्कव्हरी’ शटलमधून (STS-116) अंतराळात झेप घेतली होती. 2012 मध्ये त्यांनी कझाकस्तानमधील बैकोनूर कॉस्मोड्रोमवरून त्यांनी 127 दिवसांच्या मोहिमेसाठी उड्डाण केले. यावेळी त्यांनी ‘एक्सपीडिशन 33’ चे कमांडर म्हणून पदभार सांभाळला आणि अंतराळ स्थानकावरील रेडिएटर गळती दुरुस्त करण्यासाठी तीन स्पेस वॉक केले.

जून 2024 मध्ये त्यांनी बुच विल्मोर यांच्यासह ‘बोईंग स्टारलाइनर’मधून उड्डाण केले. त्यांनी पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाची (ISS) कमान सांभाळली. या मोहिमेदरम्यान दोन स्पेस वॉक पूर्ण करून त्या मार्च 2025 मध्ये ‘स्पेसएक्स क्रू-9’ द्वारे पृथ्वीवर सुखरूप परतल्या.