
>> वैश्विक
[email protected]
27 जुलै 1969 रोजी अमेरिकेने माणूस चंद्रावर उतरवला त्यावेळी चांद्रभूमीवर पाऊल ठेवताना ‘एका माणसासाठी छोटे, पण मानवतेसाठी मोठे पाऊल मी टाकले आहे.’ असे समर्पक उद्गार नील आर्मस्ट्राँग यांनी काढले. ही मोहीम कठीण आहे म्हणूनच आम्ही हाती घेत आहोत असं त्या मोहिमेपूर्वीचे अमेरिकन अध्यक्ष जॉन केनेडी यांनी जाहीर केलं होतं. त्यात वैज्ञानिक संशोधनाच्या आत्मविश्वासाइतकाच पहिला अंतराळयात्री अवकाशात पाठवणाऱ्या रशियाला, असूयेतून दिलेला इशाराही होता. पण वैज्ञानिक संशोधन राजकीय कार्यक्रमांवर (अजेंडा) ठरवता आलं तरी चालतंच असं नाही. अर्थात ‘नासा’च्या संशोधकांनी केनेडींचे शब्द खरे करून दाखवले 1970चं दशक पूर्ण होण्यापूर्वीच अमेरिकेने चंद्र पादाक्रांत केला. मात्र ते पाहायला केनेडी नव्हते. युद्धखोर आणि पुढे वॉटरगेटमध्ये बदनाम झालेले निक्सन अमेरिकेचे अध्यक्ष होते.
हा इतिहास उगाळण्याचं कारण म्हणजे, अमेरिकेला आता पुन्हा चंद्रावर माणूस पाठविण्याची ऊर्मी उत्पन्न झाली आहे. त्यासाठी ‘आर्टेमिस’ हा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम हाती घेण्यात आला. या मोहिमेतले ‘आर्टेमिस-1’ हे मानवविरहित यान चंद्राभोवतीच्या कक्षेत पाठवून यशस्वीरीत्या परत आणण्यात आले. त्याने 25 दिवस 10 तास 52 मिनिटे आणि 46 सेकंदांचं आपलं कार्य (मिशन) यशस्वी केलं.
भविष्यकाळात एखादा माणूस नव्हे, तर पर्यटक माणसंही चंद्रावर पाठवून पृथ्वीवर सुखरूप परत आणण्याची असतील तर कोणती सुरक्षित यंत्रणा वापरावी लागेल याची ही पहिली चाचणी (टेस्ट) होती. ‘नासा’ त्यात उत्तीर्ण झाली. या मोहिमेच्या ‘ओरायन’ (मृग) यानामधून मानवसदृश ‘रोबोट’सारखे कृत्रिम बुद्धिमत्तेचे ‘अंतराळयात्री’चे चार ‘पुतळे’ त्यांना ‘मेनेकिन’ऐवजी चंद्रावरून ‘मूनेकिन’ संबोधण्यात आलं. अशी नावं देण्यात अमेरिकन कल्पकता दिसली. या कृत्रिम प्रज्ञेच्या यंत्रयात्रींना दिलेलं कार्य सुफळ संपूर्ण होताच ‘नासा’चा हुरुप वाढला. मग आर्टिमिस-2 या यानाची जोरदार तयारी सुरू झाली.
या यानातून मात्र रिडवाइजमन, व्हिक्टर ग्लोव्हर, क्रिस्तिना कुक आणि जेरेमी हॅन्सन या चार अंतराळयात्रींनी 10 दिवसांसाठी चांद्रपरिक्रमा करून चंद्राची विविध आणि इथंभूत माहिती मिळवावी असं ठरलं. पुढच्या ‘कमर्शियल’ चांद्रयानांसाठी हा ‘डेटा’ अत्यंत महत्त्वाचा ठरणार असल्याने त्याकडे अनेक खासगी धनवंत डोळे लावून बसले आहेत. इलॉन मस्क तर चंद्र-मंगळावर लोकांना घेऊन जाण्याच्या गप्पा कधीपासून करतायत!
2023 मध्ये ‘नासा’ने आर्टेमिस-2साठीच्या ‘क्रू’ म्हणजे अंतराळयात्रींची नावं जाहीर केली. या वर्षीच्या आरंभी हे रॉकेट आणि त्यावरची ‘ओरायन’ ही अंतराळयात्रींसाठीची ‘पॅप्सूल’ तयार झाली. त्यानंतर ‘आर्टेमिस-2’च्या उड्डाणाची तारीख पे तारीख सुरू झाली. आधी 2025च्या सप्टेंबरमध्ये या यानाचं उड्डाण होईल असं वाटलं. मात्र आयत्या वेळी त्याचं हीट-शिल्ड (उष्णतारोधक कवच)ठीक नसल्याचं आणि इंधन गळतीची शक्यता जाणवल्याने पुढे ढकलण्यात आलं. ते योग्यच होतं. कारण आर्टेमिस-1 ने जेव्हा ‘ओरायन’ पॅप्सूल बनवली तेव्हा 2022 मध्ये ते स्पेसमध्ये जाऊन आल्यानंतर त्याच्या कवचामध्ये तडे आणि झीज आढळली. त्या मोहिमेत माणसं नव्हती खरी, पण ओरायन पुन्हा माणसांना घेऊन जाणार असेल तर संपूर्ण सुरक्षित (फुलप्रूफ) यंत्रणा असणं गरजेचे.
त्यात योग्य ती दुरुस्ती केली गेली. त्यामुळे आर्टेमिस-2 यानाचे उड्डाण 2023 पासून अनेकदा लांबलं. नंतर 2024 मध्ये ते अवकाशात जाणार असल्याच्या बातम्या आल्या. तांत्रिक कारणांनी त्या पह्ल ठरल्या. त्यानंतर 2025 मधला ‘मुहूर्त’ धरला गेला. त्यावेळीही ओरायन पूर्णपणे सक्षम असल्याचं वैज्ञानिकांना वाटलं नाही आणि कुणाच्या जिवावर बेतू शकणारा धोका पत्करण्यात कोणताही शहाणपणा नव्हता.
त्यामुळे 2026च्या फेब्रुवारीमध्ये ‘आर्टेमिस-2’ नक्की उड्डाण करेल, कारण तोपर्यंत त्याची आणि ओरायन कॅप्सूलची सर्वंकष तपासणी पूर्ण झालेली असेल असा आत्मविश्वास नासाला वाटला; परंतु फेब्रुवारीत उड्डाण शक्य झालं नाही. अखेर 6 मार्च 2026 ही तारीख ठरली. ‘काउंट डाऊन’ सुरू झाल्याचंही म्हटलं गेलं; पण पुन्हा कुठेतरी माशी शिंकली आणि यानाच्या इंधनातील हिलियम वायूची गळती होतेय हे लक्षात आलं. यातून मोठा धोका उद्भवू शकला असता. त्यामुळे ताबडतोब उड्डाण रोखण्याचा निर्णय घेण्यात आला. आता पुढची तारीख आहे 1 एप्रिल 2026. त्या दिवशी ‘आर्टेमिस-2’ उडतं की ‘एप्रिल फूल’ करतं ते समजेलच.
या मोहिमेचं वैशिष्ट्य म्हणजे, आजपर्यंतच्या एकाही चांद्रमोहिमेत महिला अंतराळयात्रीची निवड केली गेली नव्हती. ती उणीव दूर करण्यात आली आहे. क्रिस्तिना कक पिंवा कुल ही अंतराळयात्री आर्टेमिस-2च्या पायलट म्हणून चांद्रमोहिमेवर जाईल. (तिच्या नावाचं स्पेलिंग Kooh असलं तर उच्चार ‘कक’ पिंवा कुक असा आहे.)






























































