
वर्ष 2024 मध्ये जागतिक समुद्र पातळीत अपेक्षेपेक्षा जास्त वाढ झाली आहे, अशी माहिती अमेरिकन अंतराळ संस्था नासाने दिली आहे. याच संदर्भात माहिती देताना नासाचे समुद्रशास्त्रज्ञ जोश विलिस यांनी सांगितलं की, समुद्राची पातळी वेगाने वाढत आहे. ही अनपेक्षित वाढ हिमनद्या वितळण्याऐवजी समुद्राच्या पाण्याच्या थर्मल विस्तारामुळे झाली आहे, जी या वाढीच्या दोन तृतीयांश आहे, असं ते म्हणाले.
जोश विलिस म्हणाले की, 2024 मध्ये आम्हाला दिसलेली वाढ आमच्या अपेक्षेपेक्षा जास्त होती. दरवर्षी कमी प्रमाणात वाढ होत असते. मात्र 2024 मध्ये सर्वाधिक वाढ झाली. तसेच समुद्राची पातळी वाढीचा दर जलद आणि वेगवान होत आहे.” दरम्यान, अलिकडच्या काळात समुद्राच्या पातळीत झालेल्या वाढीपैकी सुमारे दोन तृतीयांश वाढ बर्फाचे थर आणि हिमनद्या वितळण्यामुळे झाली आहे. 1992 पासून जागतिक समुद्र पातळी 4 इंच (10 सेंटीमीटर) वाढली आहे. जागतिक तापमानात वाढ झाल्यामुळे समुद्र पातळी वेगाने वाढत आहे.