नेस्कोतील हायटेक आरोग्य सुविधा पालिकेला मिळणार; पालिकेची 50 ते 75 लाखांची बचत होणार

1124

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, मुंबई महानगरपालिका आणि सीएसआर फंडातून सुरू करण्यात आलेल्या नेस्को कोरोना केंद्रातील सर्व हायटेक आरोग्य सुविधा हे केंद्र बंद झाल्यानंतर पालिकेला मिळणार आहेत. त्याचबरोबर पहिल्या तीन महिन्यानंतर कंत्राटदार यातील सुविधांवर कोणतेही भाडे आकारणार नाही. कोरोना असेपर्यंत कंत्राटदार हायटेक सुविधांची देखभाल विनामोबदला करणार असून त्यामुळे पालिकेची 50 ते 75 लाखांची बचत होणार आहे, अशी महत्त्वपूर्ण माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, गोरेगाव येथील नेस्को मैदानावर उभारण्यात आलेल्या कोरोना आरोग्य केंद्राच्या उभारणीत तसेच त्याच्या प्रशासकीय कार्यवाहीमध्ये कोणतीही आर्थिक व प्रशासकीय अनियमितता झालेली नाही. हे केंद्र सुरू करताना पालिकेला वाजवी व रास्त दरामध्ये सेवा मिळण्यासह कॉर्पोरेट सामाजिक उत्तरदायित्वाच्या (सीएसआर)चेही सहकार्य मिळेल, अशीच कार्यवाही केली, अशी माहिती पालिका प्रशासनाने दिली.

1)नेस्को कोरोना केंद्राची क्षमता 100 वरुन प्रारंभी 850 तर त्यानंतर 2 हजार बेड्स करण्याचा व होणारा काही खर्च पालिका निधीमधून तर काही खर्च सीएसआर निधीतून करण्याचा निर्णय पालिकेने घेतला.

2) प्रत्येक रुग्णशय्येसोबत एक पंखा, रुग्णासाठी आवश्यक गादी, चादर, उशी, वैयक्तिक वापराचे इतर साहित्य यासह केंद्रासाठी लागणारे सर्व साहित्य, विद्युत यंत्रणा, केंद्रामध्ये प्रत्येक बेडसोबत एक ऑक्सिजन सिलिंडर व त्याला पूरक अशी यंत्रणा पुरवणे ही सर्वच कामे कंत्राटदार ‘मेसर्स रोमेल रिअ‍ॅल्टर्स’ करणार आहे. या सर्व साहित्यांची देखभाल व दुरुस्तीची जबाबदारीदेखील कंत्राटदार ‘मेसर्स रोमेल रिअ‍ॅल्टर्स’वर आहे.

3) पाणीपुरवठा व धुलाई वगळून याचा एकूण 8 कोटी 41 लाख रुपयांचा खर्च (जीएसटी वगळता) आहे. मूळ कार्यादेशातील काही बाबी पुरवठा न करण्यासंबंधी किंवा कमी संख्येने पुरवठा करण्याबाबत ‘मेसर्स रोमेल रिअ‍ॅल्टर्स’ यांना सांगण्यात आल्याने पालिकेची सुमारे 50 ते 75 लाख रुपयांपर्यंत बचत होणार आहे.

4) कोरोनोची साथ संपून नेस्को केंद्र बंद झाल्यावर पुरवण्यात आलेले काही साहित्य जसे पंखे, प्लास्टिक खुर्च्या, विजेचे दिवे, बेड्स, गाद्या, उश्या, चादरी, सलाईन स्टँड, विद्युत फिटिंग, सीसीटीव्ही कॅमेरे इत्यादी सर्व साहित्य पालिकेला देणगी स्वरूपात मिळणार आहे तर क्ष-किरण (एक्स रे) संयंत्र, ऑक्सिजन ड्युरा सिलिंडर्स, स्टील रॅक्स, पोर्टा कॅबिन्स, डीटीएच कनेक्शन, डॉक्टर्सचे क्युबिकल्स, लॉकर्स, स्टील कपाटे अशा सुमारे 1 कोटी 6 लाखाच्या वस्तू पालिकेला दिलेल्या आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या