
भोंदूबाबा अशोक खरातने अघोरी विद्या, मंत्र-तंत्राच्या नावाखाली अनेक महिलांचे लैंगिक शोषण करून आयुष्य उद्ध्वस्त केले. या विकृताने तब्बल सहा वर्षे एका महिलेला छळले, घटस्फोट घेण्यास भाग पाडून लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केला. नंतर गर्भपात घडवून सतत ब्लॅकमेल केले, हा तिसरा गुन्हा सरकारवाडा पोलिसांत रविवारी दाखल झाला. खरातविषयी सातत्याने धक्कादायक घटना समोर येत आहेत.
खरात हा लैंगिक शोषणाच्या गुह्याखाली 18 मार्चपासून पोलीस कोठडीत आहे. सरकारवाडा पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध 22 मार्च रोजी आणखी एका पीडितेने तक्रार दिली. लैंगिक अत्याचार; महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा, जादुटोणा प्रतिबंधक कायद्यान्वये हा तिसरा गुन्हा दाखल झाला. ही महिला फेब्रुवारी 2020 ते 18 मार्च 2026 पर्यंत खरातच्या वासनांधतेचा बळी ठरली. विवाहित असताना ‘तुझ्या भाग्याविषयी बोलायचे आहे, संसारातील वाद-विवाद मिटवू,’ असे सांगून त्याने बोलावले. कार्यालयात मंतरलेले पाणी प्यायला देऊन विधीच्या नावाखाली वेळोवेळी अत्याचार केला, पुढे घटस्फोटानंतर पुन्हा अतिप्रसंग केले, ती त्याच्यापासून गर्भवती राहिली हे कळताच गर्भपात घडवून आणला. त्याच्या म्हणण्याप्रमाणे वागण्यास तिने नकार दिल्यावर मुलांचे बरेवाईट होईल, असे सांगून धमकावले. आठवडाभरात खरातची भोंदूगिरी चव्हाटय़ावर आल्यानंतर ही महिला तक्रार देण्यासाठी पुढे आली.
आयपीएस अधिकारी तेजस्वी सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली खरात व संबंधितांची कसून चौकशी सुरू असून यातून अनेक धक्कादायक खुलासे होण्याची चिन्हे आहेत.
चिंचोक्याची किंमत लाखभर
खरात हा शंभर रुपये किलो दराने रानटी चिंचोके खरेदी करायचा. ते खडय़ासारखे चमकावून घेत मंत्रून द्यायचा, यामुळे तुमच्यावरील संकटांचे निवारण होईल, असे सांगायचा. यासाठी संबंधितांकडून 10 हजारांपासून 1 लाख रुपये उकळत होता. अनेकजण यासाठी भेट घडावी म्हणून सातत्याने प्रयत्न करायचे.
कण्हत-कण्हत म्हणाला… ‘कायद्याचा बालेकिल्ला’
आपल्याकडे दैवी शक्ती असल्याचे भासवून महिलांवर अत्याचार करणारा, अनेकांना गंडवणारा खरात रविवारी सायंकाळी गुन्हे शाखेच्या कार्यालयातून कण्हत-कण्हत आणि लंगडत बाहेर पडला. याआधी शहर पोलिसांनी गुंडांकडून ‘नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला’ हे वाक्य वदवून घेतले होते, ते वाक्य तो कसेबसे उच्चारू शकला, त्याच्यात बोलण्याची, चालण्याची ताकद नव्हती. तपासादरम्यान पोलिसांनी चांगलाच पाहुणचार करून खरातचे सोंग उतरवले आहे.
तो कॅप्टन नाही, साधा खलाशीच
मर्चंट नेव्हीतून सेवानिवृत्त झाल्याचे खरात सर्वांना सांगत होता. मात्र, तो दहावीपर्यंतच शिकलेला असून, 22 वर्षे जहाजावर खलाशी म्हणून काम करत होता, अशी चर्चा आहे.
आज न्यायालयात हजर करणार
खरातला 18 मार्च रोजी अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 24 मार्चपर्यंत पोलीस कोठडी दिली, ही मुदत उद्या मंगळवारी संपणार असल्याने त्याला पुन्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे.
खोटय़ा वीस फुटी नागाचा भोंदूगिरीसाठी वापर
खरात हा त्याच्याकडे येणाऱया लोकांसमोर नागपूजेचा घाट घालायचा. काही मंत्र पुटपुटून तो हातात असलेल्या रिमोटने नियंत्रित होणारा खोटा, पण खराखुरा वाटावा असा वीस फुटी नाग समोर बोलवायचा. नाग समोर येऊन डोलू लागायचा, फणा काढायचा, हे बघून अनेकांची बोबडी वळत होती, काही जण बेशुद्धही झाले होते. मी नागाला वश करतोय असे तो दाखवायचा, हा चमत्कार असल्याचे भासवून त्याने अनेकांना जाळ्यात ओढले होते. याचप्रकारे तो वाघाच्या नकली कातडीचाही वापर करून भुलवत होता.



























































