उडान योजनेंतर्गत बेळगाव-नाशिक मार्गावर पहिली थेट उड्डाण सेवा सुरु

केंद्र सरकारच्या आरसीएस-उडान (प्रादेशिक संपर्क योजना – उडे देश का आम नागरिक) अंतर्गत नाशिक आणि बेळगाव हवाई मार्गावर सोमवारी पहिली थेट विमानसेवा सुरू झाली. या मार्गावरील विमानसेवा सुरु झाल्याने आता बेळगाव देशातील 10 शहरांशी हवाईमार्गाने जोडले जाईल. नागरी उड्डयन मंत्रालय (एमओसीए) आणि हिंदुस्थानी विमानतळ प्राधिकरण (एएआय) चे अधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित होते. आतापर्यंत, उडान योजनेंतर्गत 311 मार्ग कार्यान्वित करण्यात आले आहेत.

आजपर्यंत बेळगाव-नाशिक या मार्गावर थेट विमानसेवा / ट्रेनची उपलब्धता नसल्याने बेळगाव-नाशिक थेट हवाई सेवा सुरु करण्यासाठी अनेक अर्ज प्राप्त झाले होते. लोकांना या मार्गावर 10 तासांपेक्षा अधिक रस्ते प्रवास करावा लागत होता. नाशिक हे एक मोठे पर्यटन आणि व्यवसाय ठिकाण आहे.

कुंभमेळ्याचे आयोजन करणाऱ्या चार तीर्थक्षेत्रांपैकी एक आणि शिर्डी साई मंदिर व त्र्यंबकेश्वरला जाण्याचे प्रवेशद्वार असल्याने नाशिक येथे दरवर्षी लाखो पर्यटक येतात.

उडान 3 बोली प्रक्रियेदरम्यान स्टार एअर कंपनीला बेळगाव-नाशिक मार्गावर विमान सेवा करण्याची परवानगी देण्यात आली. सर्वसामान्यांसाठी स्वस्त आणि परवडणारे विमान भाडे उपलब्ध करून देण्यासाठी विमान कंपन्यांना उडान योजनेंतर्गत व्हायबिलिटी गॅप फंडिंग (व्हीजीएफ) देण्यात येत आहे. विमान कंपनी या मार्गावर आठवड्यातून तीन वेळा विमान सेवा सुरु करणार असून कंपनीने या मार्गावर 50 सीटर एम्ब्रेअर ईआरजे-145 विमान तैनात केले आहे. विमान कंपनीचा हा 15 वा उडान मार्ग आहे.

आपली प्रतिक्रिया द्या