कांद्यावर बोला, भूलथापा बंद करा; दिंडोरीत मोदींच्या सभेत शेतकऱ्यांच्या संतापाचा भडका

भूलथापा बंद करा, कांद्यावर, शेतकरी प्रश्नांवर बोला, अशी घोषणाबाजी करीत शेतकऱयांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेत संताप व्यक्त केला. यानंतर एकच गोंधळ उडाला. निर्यातबंदीच्या शेतकरीविरोधी धोरणामुळे निर्माण झालेल्या रोषाने आंदोलन होऊ नये यासाठी पोलीस प्रशासनाने शेतकऱयांचा आवाज दाबण्याच्या केलेल्या उपाययोजना यामुळे सपशेल फेल ठरल्या. शेतकऱयांच्या संतापानंतर मोदींनी कांद्यावर भाष्य करीत सारवासारव केली. मात्र, ते जखमेवर मीठ चोळणारेच होते.

पिंपळगाव बसवंत येथे बुधवारी दुपारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा झाली. आपल्या भाषणात त्यांनी कांदा उत्पादक शेतकऱयांच्या प्रश्नांवर, गेल्या वर्षभरातील समस्यांवर काहीच भाष्य केले नाही. वाराणसी येथे नामांकन भरल्याचे सांगून नंतर केवळ विरोधकांवर आगपाखड सुरू केली. काँग्रेस सत्तेत आल्यास अर्थसंकल्पातील 15 टक्के भाग अल्पसंख्यांकासाठी राखून ठेवतील, असे तुणतुणे मोदींनी वाजवले. भाषण असेच लांबत गेले. मोदी आपल्या प्रश्नांवर बोलतील या प्रतीक्षेत शेतकरी होते. इथल्या मूळ प्रश्नांना ते बगल देत आहेत, हे लक्षात आल्यावर संतापलेल्या एका शेतकऱयाने ‘मोदीजी कांद्यावर बोला, भूलथापा बंद करा’, अशा घोषणा द्यायला सुरुवात केली. यामुळे एकच गोंधळ उडाला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेवून बाहेर काढले. यानंतर भाषणाच्या शेवटी शेवटी मोदी यांनी निर्यातबंदीच्या विषयावरून सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. सरकारने कांद्यासाठी बफर व्यवस्था केली, दहा वर्षांत 35 टक्के निर्यात वाढली, गेल्या दहा दिवसात निर्यातबंदी दूर करताच 22 हजार मेट्रिक टन निर्यात झाल्याचे सांगितले. ऑपरेशन ग्रीनद्वारे सबसीडी देणार असल्याचा उल्लेख केला. हे त्यांचे शेतकरीप्रेम जखमेवर मीठ चोळणारेच ठरले, त्यात काहीही दिलासा देणारे नव्हते. खरे तर सरकारच्या निर्यातबंदीच्या धोरणामुळे जिह्यातील शेतकरी देशोधडीला लागले आहेत. मागील वर्षी कांद्याला चांगला भाव मिळत असताना बंदी लादल्याने दर निम्म्यावर आले, नंतर मातीमोल भावाने कांदा विकावा लागला. पंचवीस हजार कोटींहून अधिक रुपयांचे नुकसान झाले आहे. मोदी यांनी आपल्या भाषणातून शेतकऱयांची क्रूर चेष्टा केली, असा संताप सर्वत्र व्यक्त होत आहे.

…तरीही दिशाभूलच केली

शेतकऱयाने संताप व्यक्त केल्यानंतर मोदी कांद्यावर बोलले. पाच लाख मेट्रिक टन बफर स्टॉक केला, असे सांगितले. नाफेडने फार्मर प्रोडय़ूसर पंपन्यांमार्फत खरेदी केलेला हा बफर स्टॉक आहे, त्यात मोठा भ्रष्टाचार झाला आहे, त्याचे उत्तर मात्र मोदींनी दिले नाही. निर्यातबंदी उठविल्यानंतर आठवडाभरातच 22 हजार टन कांदा निर्यात झाल्याचे त्यांनी सांगितले. प्रत्यक्षात मात्र 10 हजार टन सुद्धा कांदा अद्यापपर्यंत निर्यात झालेला नाही. साडेपाचशे डॉलर प्रती मेट्रिक टन किमान निर्यात मूल्य आणि चाळीस टक्के निर्यात शुल्क यामुळे निर्यात थंडावली आहे, यावर मात्र मोदींनी चकार शब्दही काढला नाही. एकूणच कांदा प्रश्नाबाबत मोदींनी शेतकऱयांची दिशाभूलच केली.

पोलिसांचे प्रचंड हाल

या सभेसाठी राज्यभरातून पोलिसांची कुमक मागवण्यात आली होती. सभेच्या ठिकाणी काल मंगळवारपासून कडेकोट बंदोबस्त तैनात होता. मात्र, त्यांच्या जेवण, निवास व्यवस्थेचे योग्य नियोजन नव्हते. परिणामी, कडकडीत उन्हात पाणी, जेवणाअभावी त्यांचे प्रचंड हाल झाले.

चिल्लरला बंदी, नोटांना मुभा, डोकेही तपासले

सभास्थळी आलेल्या आणि आणलेल्या नागरिकांची पोलिसांकडून ठिकठिकाणी कडक तपासणी करण्यात आली. वाहनाच्या चाव्या, मोबाईल, पॉवर बँक, चिल्लर, नाणी, पेन आदी वस्तू नेण्यास बंदी करण्यात आली होती. या वस्तू बरोबर घेऊन जाण्याचा हट्ट धरणाऱयांना धमकावून परत पाठविले जात होते. एकीकडे नाण्यांना बंदी केली जात होती, दुसरीकडे ठराविक लोकांना खिशातून नोटा बाळगण्यास मुभा दिली जात होती. आंदोलनाच्या धास्तीने केली गेलेली तपासणी म्हणजे ‘जखम डोक्याला अन् मलम गुडघ्याला’ अशी तऱहा असल्याचे मत नागरिक व्यक्त करीत होते. उन्हामुळे बरेचजण डोक्यावर टोपी घालून आले होते, ती टोपी काढून टोपीखाली, डोक्याच्या केसात कोणी काही लपविले आहे का, याची खात्री केली जात होती. मोदी सरकारचे खरोखर डोके फिरलेय, आता दिवसही फिरतील, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली जात होती.

लासलगावात आंदोलकांवर कारवाई

लासलगाव येथे बुधवारी सकाळी कांद्याच्या माळा गळ्यात घालून निर्यातबंदीचा निषेध करणाऱया आंदोलकांवर पोलिसांनी कारवाई केली. बाजार समितीचे माजी सभापती जयदत्त होळकर, डॉ. सुजीत गुंजाळ, शिवा सुरासे, डॉ. विकास चांदर, विकास रायते, महेश होळकर, संतोष पानगव्हाणे, गोकुळ पाटील, प्रमोद पाटील, भरत होळकर, राहुल शेजवळ, मयुर बोरा यांच्यासह दहा ते बारा जणांना ताब्यात घेण्यात आले.

पोलिसांची दडपशाही

सभेवेळी शेतकरी, सामान्य नागरिक आपला संताप व्यक्त करतील या भीतीपोटी पोलिसांनी कालपासूनच दडपशाही सुरू केली. एवढे करूनही सभेमध्ये एका शेतकऱयाने पंतप्रधानांना जाब विचारलाच आणि सभेत गोंधळ उडाला. त्यामुळे पोलीस प्रशासनाने मोठी खबरदारी घेऊनही शेवटी पंतप्रधानांना जिह्यातील कांदा उत्पादकांच्या रोषाला सामोरे जावेच लागले. हाच रोष मतदानातूनही दिसून येणार आहे, अशीच चर्चा सर्वत्र सुरू आहे.

राहुल गांधींचा जयघोष!

अचानक घोषणाबाजी सुरू झाल्याने मोदींच्या भाषणाला ब्रेक लागला. ते काहीसे कावरेबावरे झाले. शेतकरी प्रचंड आक्रमक झाले होते. कांद्यावर बोला, अशा घोषणा घुमल्यानंतर देश का नेता पैसा होगा… राहुल गांधी जैसा होगा, अशी घोषणाही गर्दीतून दिली गेल्याने भाजपची गोची झाली.

n पंतप्रधानांच्या सभेवेळी गोंधळ होण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी आधीच कारवाईचा दंडुका उगारला होता. निफाडमधील शिवसैनिकांना स्थानबद्ध करण्यात आले. शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱयांना नोटिसा देऊन धमकावण्यात आले. जिह्यात सर्वत्र आंदोलनाला बंदी करण्यात आली. याच भीतीच्या सावटाखाली आजची सभा पार पडली, सभा घाईघाईत उरकण्यात आली.