
सलग चौथ्या दिवशी गुरुवारी जिह्यात अवकाळीचा मुक्काम कायम होता. एप्रिलपाठोपाठ मे महिन्यातही अवकाळीने थैमान घातल्याने कांदा, आंबा, भाजीपाला, डाळिंब उत्पादकांना मोठा फटका बसला. चाळीत साठवून ठेवलेला कांदाही भिजला. पुढील चार दिवस वादळासह मध्यम ते तुरळक पावसाची शक्यता असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.
जिह्याच्या बहुतांश भागाला सोमवारपासून कमी, अधिक प्रमाणात अवकाळीसह गारपिटीचा दणका बसला आहे. गुरुवारीदेखील त्याने हजेरी लावलीच. नाशिक शहर व उपनगरांमध्ये दुपारनंतर अंधारून आले होते. मखमलाबाद भागात जोरदार सरी बरसल्या. गंगापूर, मुंबई नाका परिसरही पावसाने जलमय झाला. सटाणा तालुक्यात नामपूर, द्याने, टेंबे, उतराणे, तळवाडे, बाणेर या गावांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. सुरगाणा, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, मालेगाव, पेठ, नांदगाव, सिन्नर, येवला, चांदवड तालुक्यातही त्याने हजेरी लावली. वादळी वाऱयाचाही फटका काही भागाला बसला. सटाण्याच्या पारनेर येथे महादू भदाणे आणि तळवाडे दिगरला बाळू पगार यांच्या घरांचे पत्रे उडाले. सुराणे येथे संजय ठोके यांच्या कांदा चाळीचे पत्रे उडून मोठे नुकसान झाले.
जिह्याला हवामान खात्याने 9 ते 12 मेपर्यंत म्हणजे चार दिवस यलो अलर्ट दिला आहे. त्यामुळे काही भागात वादळासह तुरळक ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो, असा अंदाज आहे.