नाशिकच्या शेतकऱ्यामुळे आफ्रिकन ‘क्रौंच’ला जीवदान

सुमारे 8700 किलोमीटरचा प्रवास करून आलेला आफ्रिकन ब्ल्यू व्रेन (क्रौंच) पक्षी अशक्तपणामुळे देवळा तालुक्यातील मकरंदवाडीतील शेतात कोसळला. शेतकरी गुलाब भदाणे यांनी दाखवलेल्या सतर्पतेमुळे पक्ष्याला वेळीच उपचार मिळाले आणि त्याचे प्राण वाचले.

गुलाब भदाणे मंगळवारी शेतात काम करीत असताना त्यांना एक पक्षी खाली कोसळताना दिसला. परिसरात आढळणाऱया पक्ष्यांपेक्षा तो आकाराने मोठा होता. भदाणे यांनी त्याला उचलून शेतातील चाळीत सुरक्षित ठेवले. तसेच लगेच देवळा वनविभागाला कळवले. वनपाल डी. पी. गवळी, वनरक्षक जी. जी. पवार कर्मचाऱयांसह तिथे पोचले. त्यांनी त्वरित उपचार सुरू केल्याने पक्ष्याला जीवदान मिळाले.

हा आफ्रिकन ब्ल्यू व्रेन जातीचा पक्षी असून, अंदाजे 8 हजार 700 किलोमीटरचा प्रवास करून आला आहे. नांदूरमध्यमेश्वर येथील अधिवासाकडे जात असताना अशक्तपणामुळे खाली पडला असावा, अशी शक्यता वनपरिक्षेत्र अधिकारी व्ही. बी. पाटील यांनी वर्तविली आहे. त्याची प्रकृती सुधारत असून, उडण्यायोग्य झाल्यावर त्याला मुक्त केले जाईल, अशी माहिती वनविभागाने दिली आहे.

जगभरात क्रोंच

पक्ष्यांच्या काही प्रजाती दुर्मीळ होत चालल्या आहेत. प्रजननासाठी अधिकतर प्रजाती स्थलांतर करतात. ब्ल्यू क्रौंच दक्षिण आफ्रिकेत आढळतो. त्याची एक उपप्रजाती पूर्व आफ्रिकेतदेखील आढळते.

आपली प्रतिक्रिया द्या