शेतकऱयांच्या समस्या जाणून न घेताच माघारी फिरले केंद्राचे पथक

1095

अवकाळी पावसाने राज्यात झालेल्या शेतीच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी शुक्रवारी केंद्रीय पथक महाराष्ट्रात आले होते. हा पाहणी दौरा मंत्र्यांनाही लाजवेल असा होता. सुटाबुटात आलेल्या अधिकाऱयांचा आविर्भाव पाहून या दौऱयातून काहीतरी ठोस निघेल असे वाटत असतानाच हे केंद्रीय पथक अर्ध्या रस्त्यातूनच माघारी फिरले. केवळ एका गावातील शेतीची पाहणी केली. तसेच केवळ दहा मिनिटेच शेतकऱयांशी संवाद साधला. शेतकऱयांच्या समस्या जाणून न घेताच केंद्रीय पथक परत गेल्याने शेतकऱयांमध्ये प्रचंड संताप खदखदत आहे.

केंद्रीय पथकाने नाशिक जिह्याचा दौरा एका दिवसातच आटोपला. सुटाबुटात तीन इनोव्हा कारमधून केंद्रीय कृषी मंत्रालयाचे सुभाष चंद्रा आणि त्यांचे पथक नाशिक जिह्यामधील गावात अवतरले. या ताफ्यात एकूण 11 वाहने होती. निफाड, चांदवड आणि मालेगाव या तीन तालुक्यांतील केवळ सहा गावांतील शेतकऱयांशी या पथकातील अधिकाऱयांनी फक्त पाच ते दहा मिनिटे संवाद साधला. तसेच एका गावात केवळ एकाच शेतीची पाहणी या पथकाने केली. शेतकऱयांच्या समस्या जाणून न घेताच हे केंद्रीय पथक माघारी फिरले. नाशिक जिह्यात अवकाळी पावसाने शेतीचे मोठे नुकसान झाले असून त्याची पाहणी करण्यासाठी केंद्रातील द्विसदस्यीय पथक शुक्रवारी नाशिक जिह्याच्या दौऱयावर आले होते, मात्र या पथकाने चांदवड तालुक्यातील ठरलेल्या दोन गावांपैकी केवळ एकाच गावात पाहणी केली.

राज्यपालांची मदत तुटपुंजी
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शेतकऱयांना जाहीर केलेल्या मदतीनुसार कोरडवाहू शेतकऱयांसाठी दोन हेक्टरपर्यंतच्या पिकांच्या नुकसानीसाठी आठ हजारांची प्रतिहेक्टरी मदत, तर बागायत शेतीसाठी, फळबागांसाठी 18 हजार रुपयांची मदत शेतकऱयांना तत्काळ देण्याचे निर्देश राज्यपालांनी दिले आहेत, मात्र राज्यपालांनी जाहीर केलेली ही मदत तुटपुंजी असून हेक्टरी 25 हजार मदत जाहीर करावी अशी भूमिका शिवसेनेची आहे.

शेतीच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी पाचसदस्यीय केंद्रीय पथक 21 नोव्हेंबर रोजी राज्यात दाखल झाले आहे. 22, 23 आणि 24 नोव्हेंबर या तीन दिवसांमध्ये हे पथक राज्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करणार आहे. संभाजीनगर, अमरावती, नागपूर आणि नाशिक या ठिकाणी हे पथक भेट देणार आहे. डॉ. व्ही. तिरुपुगल यांच्या नेतृत्वाखाली हे पथक राज्यात आले आहे.

अमरावती विभागाला 1804 कोटींची गरज
अवकाळी पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले असून अमरावती विभागातील शेतकऱयांना 1804 कोटींची गरज असल्याचा निष्कर्ष केंद्रीय समितीने काढला आहे. पथकाचे सदस्य तथा केंद्रीय कापूस विकास संचालक डॉ. आर. पी. सिंह यांनी नांदगाव खांडेश्वर तालुक्यातील विविध गावांना भेटी देऊन पाहणी केली. या पहाणी दौऱयात नांदगाव, खांडेश्वर, दाभा, जळू, माहुली चोर, धानोरा, गुरव आदी गावांना भेटी देऊन तेथील शेतकरी बांधवांशी संवाद साधला. डॉ. सिंह यांनी एकनाथ ग्रेसपुंजे, मारोतराव वाठ आदी शेतकऱयांशी संवाद साधला. गेल्या वर्षीच्या तुलनेत कपाशीच्या बोंडाची संख्या घटल्याचे शेतकऱयांनी सांगितले. वेचण्यांची संख्याही कमी झाल्याचेही डॉ. देशमुख यांनी यावेळी नोंदवले. चळू येथील शेतकरी संजय भागरे यांच्या शेतात भेट देऊन कपाशीची पाहणी करण्यात आली. माहुली चोर येथील शेतकरी बाबाराव डोंगरे, धानोरा गुरव येथील शेतकरी मनोज चव्हाण यांच्याशी चर्चा करून सोयाबीनच्या पिकाच्या नुकसानाची माहिती घेतली. दरम्यान, जिह्यात सोयाबीन, कापूस, तूर या पिकांचे मोठे नुकसान झाले असून मदतीसाठी 298 कोटी 91 लाख रुपयांची गरज असल्याचे प्रशासनाच्या वतीने पथकाला सांगण्यात आले.

आपली प्रतिक्रिया द्या