
कुंभमेळय़ाच्या निमित्ताने महायुती सरकार मुलभूत सुविधांच्या नावावर कंत्राटदारांवर मेहेरबान झाले आहे. नाशिकमध्ये महापालिकेच्या माध्यमातून कुंभमेळय़ासाठी मलनिःसारण प्रकल्प राबवला जाणार आहे. त्यावर 2 हजार 600 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. त्यातून पुढील पंचवीस वर्षांच्या मेण्टेनन्सचा खर्च वगळता प्रकल्पाची किंमत 1482 कोटी रुपये आहे आणि त्यातील 70 टक्के निधी अनुदान म्हणून राज्य सरकार देणार आहे. कंत्राटदाराला फक्त 444 कोटी रुपये खर्च करावा लागणार आहे.
2026-27 मध्ये नाशिकमध्ये कुंभमेळा होणार आहे. त्यासाठी देशभरातून लाखो भाविक येण्याची शक्यता आहे. त्यांच्या मुलभूत सुविधांसाठी राज्य शासन उपाययोजना करत आहे. मलनिःसारण प्रकल्प हा त्याचाच एक भाग आहे. तो सार्वजनिक-खासगी भागीदारीतून राबवण्यास शासनाने आज मंजुरी दिली. 1482.95 कोटी रुपयांच्या या प्रकल्पात राज्य शासन 1038.07 कोटी रुपये देणार आहे, तर 444.88 कोटी कंत्राटदार संस्थेला खर्च करावे लागणार आहेत.