नाशिक महापालिकेचे 2 हजार 161 कोटींचे अंदाजपत्रक स्थायी समितीला सादर

428

नाशिक महापालिकेचे सन 2020-21 या आर्थिक वर्षाचे 2 हजार 161 कोटी रुपयांचे अंदाजपत्रक आज मंगळवारी आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी स्थायी समितीला सादर केले. यात कोणतीही दरवाढ सुचविण्यात आलेली नाही. मात्र, पाणी पुरवठ्याचा खर्च वसूल करण्यासाठी उपभोक्ता कर लागू करण्याची शिफारस करण्यात आली आहे. प्रत्येक नगरसेवकाला 39 लाख 44 हजार रुपयांच्या विकास निधीची, तर शहर बससेवेसाठी 70 कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे.

नाशिक महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी मंगळवारी स्थायी समितीचे अध्यक्ष उद्धव निमसे यांना हे अंदाजपत्रक सादर केले. दोन टक्के या लेखाशिर्षकाखालील 12 कोटी रुपयांच्या निधीतून प्रत्येक नगरसेवकाला विकासकामांसाठी 9 लाख 44 हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. 38 कोटी 10 लाख रुपयांच्या प्रभाग विकास निधीतून प्रत्येक नगरसेवकाला विकासकामांसाठी 30 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली. शहर बससेवेसाठी 70 कोटी, खेडे व नवनगरांसह मुख्य रस्त्यांसाठी 166 कोटी, क्रीडांगण विकासासाठी 28.20 कोटी, पाणीपुरवठा व्यवस्थापनासाठी 120.46, मलनिस्सारण व्यवस्थेसाठी 135.33, विद्युत व्यवस्थेसाठी 27.43, भूसंपादनासाठी 140 कोटी रुपयांची तरतूद आहे. अडथळामुक्त शहर, सायकल ट्रॅक, पार्किंग, नाट्यगृह बांधणी, स्मशानभूमी सुधारणा, ई-गव्हर्नन्स, शिक्षण विभाग, घनकचरा विभाग, वैद्यकीय सेवा, उद्यान विकास आदींसाठीही भरीव तरतूद करण्यात आली आहे. यावर स्थायी समितीच्या बैठकीत चर्चा होवून प्रशासनाच्या या अंदाजपत्रकाला मंजुरी देण्यात येणार आहे. यामुळे या अंदाजपत्रकात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

आपली प्रतिक्रिया द्या