
महापालिका निवडणुकीत भाजपाने निष्ठावंतांना डावलून आयारामांना तिकीट दिल्याने मंगळवारी चांगलाच राडा झाला. शहराध्यक्षांकडे एबी फॉर्म असल्याचे कळताच इच्छुकांनी त्यांच्या वाहनाचा पाठलाग केल्याने वातावरण चांगलेच तापले. त्यानंतर फॉर्म वाटप सुरू असलेल्या विल्होळीच्या बंगल्याचे प्रवेशद्वार तोडून इच्छुक आत घुसले. कार्यकर्त्यांकडून एका बडय़ा उमेदवाराला मारहाण झाली. दोन कोटींना तिकीट वाटल्याचाही आरोप झाल्याने आता बंडाळीचा मोठा फटका भाजपाला बसणार आहे.
नाशिक महापालिका निवडणुकीनिमित्त केलेल्या सर्व्हेत तुम्ही मागे आहात, अशी थातूरमातूर कारणे देत भाजपाने जुन्या निष्ठावान कार्यकर्त्यांना डावलण्यात आले आणि बाहेरून आलेल्यांना उमेदवारी दिल्याने संताप उसळला आहे. आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशीही कार्यकर्ते आक्रमक झाले होते. एबी फॉर्म मिळणार नाही, अशी धास्ती घेतलेल्या काहींनी शहराध्यक्ष सुनील केदार यांच्याकडे एबी फॉर्म असल्याचे कळताच त्यांचा कारचा पाठलाग सुरू केला. बराच वेळ पदाधिकाऱयांनी या इच्छुकांना चकवा देण्याच्या प्रयत्नात कार वेगवेगळ्या रस्त्याने फिरवली. या गाडीत केदार यांच्यासह आमदार राहुल ढिकले, आमदार सीमा हिरे, महाजन यांचे निकटवर्तीय नीलेश बोरा होते. ते अखेर विल्होळी येथील एका बंगल्यावर पोहोचले, तेथे एबी फॉर्म वाटप सुरू झाले होते. या ठिकाणी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली. बंगल्याच्या प्रवेशद्वारावर लाथा मारून आत घुसून जोरदार घोषणाबाजी केली. आयाराम आणि भाजपा कार्यकर्ते यांच्यात हाणामारीही झाली.
एबी फॉर्म घेऊन आमदार, जिल्हाध्यक्ष पळाले; कार्यकर्त्यांकडून गाडीचा पाठलाग, नाशिक भाजपमध्ये हायव्होल्टेज ड्रामा pic.twitter.com/GiHdDfUQID
— Saamana Online (@SaamanaOnline) December 30, 2025
दोन कोटींना तिकीट वाटल्याचा आरोप
वर्षानुवर्ष आम्ही पक्षवाढीसाठी काम करीत आलो आहोत. कालपर्यंत माझे तिकीट निश्चित होते. मात्र, विश्वास नागरे यांना दोन कोटींना तिकीट वाटण्यात आले, असा आरोप सातपूर मंडल अध्यक्षांनी केला आहे. असाच राग महिला मोर्चाच्या वरिष्ठ पदाधिकारी असलेल्या माजी नगरसेविकेनेही व्यक्त केला.
शिंदे गटाच्या नेत्याला मारहाण
तिकीट वाटपावरून शिंदे गटातही धुमश्चक्री उडाली. नाशिकमध्ये एका वरिष्ठ पदाधिकाऱयाच्या बंगल्याबाहेर डावलले गेलेल्या इच्छुक व त्यांच्या समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी बंगल्याबाहेर पडणाऱया एका नेत्याला कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याची चर्चा होती. शिंदे गटाचा पदाधिकारी योगेश बेलदार याने फेसबुकवर ही पोस्ट केली.
































































