
विधिमंडळ सभागृहात मोबाईलवर रमी खेळण्याचा प्रकार माणिकराव कोकाटे यांना चांगलाच भोवला आणि त्यांचं खातं बदलण्यात आलं. ‘रमीपटू’ कोकाटेंकडे क्रीडा खात्याचा कार्यभार सोपविण्यात आला आहे तर दत्तात्रय भरणे यांच्याकडे कृषी खात्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. यातच आता अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी एक मोठा दावा केला आहे.
अजित पवार यांनी मला कृषिमंत्रीपदाची ऑफर दिली होती. भाजपसोबत सत्तेत आलो त्यावेळी कृषिमंत्रिपद घेण्यासाठी आग्रह करण्यात आला. अजित पवार माझ्यासाठी आग्रही होते, असा दावा त्यांनी केला आहे. नाशिक येथे माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी हा दावा केला आहे.
माध्यमांशी संवाद सावधताना छगन भुजबळ म्हणाले आहेत की, “जेव्हा भाजप आणि शिंदे गट यांच्यासोबत सरकारमध्ये आलो, त्यावेळेला अजित पवार यांनी अर्थ खातं घेतलं. त्यानंतर बाकीचे खाते माझ्यासमोर ठेवले. तुम्हाला जे खाते पाहिजे आहे ते घ्या. त्यावेळी आम्ही चर्चा केली. तेव्हा अजित पवारांनी माझ्याकडे खूप आग्रह केला होता की, कृषी खातं चांगलं आहे, हे तुम्ही घ्या.”
भुजबळ यांनी सांगितले की, अजित पवारांनी त्यांना आधीच ही जबाबदारी घेण्यास सांगितले होते, परंतु त्यांनी नकार दिला. यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या चर्चांना तोंड फुटले आहे.