
नित्कृष्ट दर्जाच्या कामामुळे मुंबई- नाशिक महामार्ग सध्या खड्ड्यात गेला आहे. त्यामुळे या मार्गावर सध्या वाहनांच्या प्रचंड रांगा लागलेल्या दिसतात. प्रवाशांचा वेळ आणि इंधन वाया जात असल्यामुळे प्रवाशांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे. प्रवाशांच्या नाराजीचा सरकारला मोठा फटका बसणार आहे. त्यामुळे महामार्गावरील खड्डे जोपर्यंत बुजवले जाणार नाहीत तोपर्यंत या मार्गावरील टोल वसुली थांबवण्यासाठीचा प्रस्ताव सादर करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिले आहेत.
मुंबई-नाशिक महामार्गावर खड्डे पडले आहेत. त्याचा वाहनधारकांना प्रचंड त्रास होत असून नाशिक ते मुंबई या तीन तासांच्या प्रवासासाठी सध्या आठ ते दहा तास लागत आहेत. तरीही टोल वसुली सुरू असल्याने प्रवाशांमध्ये संतापाचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई-नाशिक महामार्गाच्या संदर्भात अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली.
या महामार्गाची सध्याची दुरवस्था ही बाब अतिशय गंभीर असून या महामार्गाची दुरुस्ती युद्धपातळीवर करणे आवश्यक आहे. महामार्गावरील खड्डे वेळीच बुजवल्यास वाहनांचा वेग वाढून वेळेची बचत होऊ शकते, मात्र या महामार्गाच्या कंत्राटदाराकडून त्यात कुचराई झाल्याचे पाहायला मिळत आहे, अशा शब्दांत अजित पवार यांनी आपली नाराजी व्यक्त केली.
मुंबई-नाशिक महामार्गावरील भुयारी मार्ग, उड्डाणपूल यासारख्या कामांसह रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे निर्माण झालेल्या वाहतूककोंडीच्या त्रासातून नागरिकांची मुक्तता करण्यासाठी सर्व प्रकारच्या उपाययोजना युद्धपातळीवर राबवाव्यात. त्यासाठी लागणारी सर्व प्रकारची मदत राज्य सरकारमार्फत करण्यात येईल, असे पवार यांनी यावेळी स्पष्ट केले. अधिकाऱयांनी लोकप्रतिनिधींसोबत वाहतूककोंडीच्या ठिकाणांची पाहणी करून एकात्मिक वाहतूक व्यवस्थापन आराखडा तयार करावा. महामार्गावरील कार्यक्षम वाहतूक व्यवस्थेसाठी रहदारीची नियमितपणे ड्रोनद्वारे पाहणी करा. तसेच मूळ रस्त्याच्या उंचीच्या प्रमाणात काँक्रिटीकरणाचे पर्यायी रस्ते उपलब्ध करून दिल्याशिवाय नवीन कामांना परवानगी देऊ नये, अशा सूचना पवार यांनी अधिकाऱयांना केल्या.
अनेकदा वाहतूककोंडीत वाहने खराब झाल्यामुळे पाठीमागच्या बाजूला वाहनांच्या रांगा लागतात. खराब झालेले वाहन तातडीने दूर करणे आवश्यक असते. त्यासाठी आवश्यक असणाऱया 40 टनाच्या व्रेन्स वाहतूक पोलिसांनी उपलब्ध करून घ्याव्यात. त्यासाठी एनएचएआय आणि एमएसआरडीसीने वाहतूक पोलिसांना निधी उपलब्ध करून द्यावा. गर्दीच्या वेळी वाहतूककोंडीच्या ठिकाणी ड्रोनद्वारे नियंत्रण ठेवून आवश्यक उपाययोजना कराव्यात. वाहतूक नियंत्रणासाठी होमगार्डची मदत घ्यावी. एमएसआरडीसीने वाहतूक पोलिसांना उपलब्ध करून दिलेल्या वॉर्डनना गणवेश द्यावा. त्यासाठी लागणारा निधी नियोजन समितीतून दिला जाईल, असेही पवार यांनी स्पष्ट केले.
…तर अधिकारी निलंबित
जोपर्यंत या महामार्गाची डागडुजी होत नाही तोपर्यंत टोल वसुली थांबविण्यासाठीचा प्रस्ताव सादर करण्याचे तसेच मुंबई-नाशिक महामार्गावरील वाहतूक पुढील दहा दिवसांत सुरळीत न झाल्यास जबाबदार अधिकाऱयाला निलंबित करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.