येवला : दहा पाझर तलावांमध्ये सोडली पाच लाख मत्स्यबीजे

460

यंदा जून महिन्यापासूनच पावसाने हजेरी लावल्याने तालुक्यातील पाझर तलाव भरले आहेत. त्यामुळे ममदापूर, देवदरी, कोळगाव, खरवंडी, अंगुलगाव आदी गावांतील दहा पाझर तलावांमध्ये तब्बल 4 लाख 80 हजार मत्स्यबीजे सोडण्यात आले आहे. या मत्स्यबीजांच्या माध्यमातून गेल्या चार ते पाच वर्षांपासून तालुक्यातील दीडशेहून अधिक आदिवासी बेरोजगार युवकांना रोजगार हक्काचा रोजगार मिळत आहे.

पूर्व भागात गेल्या 5 वर्षांपासून मत्स्यबीजांचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमाला आदिवासी समाजातील तरुणांचा चांगला प्रतिसाद मिळत असून तलावात  पाणीही चांगले असल्याने बीज सोडण्यात आले. पूर्व भागातील आदिवासी बांधवांकडून हे बीज हैदराबाद येथून उपलब्ध करण्यात आले. प्रत्येक वर्षी पाझर तलावामध्ये मत्स्यबीज टाकण्यात येते.

या व्यवसायात अधिकाधिक तरुण सहभागी होऊन आपला व्यवसाय वाढवण्यासाठी काम करत आहे. मच्छी व्यवसायामुळे त्यांना स्थानिक रोजगार मिळाला झाला आहे. ग्रामीण भागातले हे तरुण आता मासे पकडण्यापासून ते विक्रीपर्यंत सहभाग घेत असल्याने अनेक कुटुंबांचा आर्थिक फायदा झाला आहे. विशेष म्हणजे तालुक्यात ताजा मासा मिळाल्यामुळे मागणी पण दरवर्षी चांगल्या प्रकारे वाढत असल्याचे येवला पंचायत समितीचे सभापती प्रवीण गायकवाड यांनी सांगितले.

आदिवासी बांधवांचे स्थलांतर थांबतेय

पाच वर्षांपासून आदिवासी बांधवांचे वीटभट्टी किंवा ऊसतोडीसाठी बाहेर जिह्यात मोठय़ा प्रमाणात स्थलांतर होत होते. मात्र आदिवासी बांधवांचे स्थलांतर थांबण्यासाठी गायकवाड यांनी पावले उचलली अन् मत्स्यबीज उपक्रमामुळे अनेक कुटुंबांना रोजगार मिळाला असून मुलांचे शिक्षण गावातच होऊ लागले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या