नाशिकमध्ये आजपासून विश्व मराठी संमेलन, पहिल्या दिवशी मराठी बोलींचा महोत्सव रंगणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्य शासनाच्या मराठी भाषा विभागातर्फे चौथ्या विश्व मराठी संमेलनाचा शुभारंभ उद्या गुरुवारी, 26 फेब्रुवारी रोजी मराठी बोली महोत्सवाने होणार आहे. यात अहिराणी भाषेतील गाणी, बहिणाबाईंची गाणी यासह राज्यातील बोलीभाषांचा जागर होईल.

नाशिक येथे 26 फेब्रुवारी ते 1 मार्च या कालावधीत हे संमेलन होणार आहे. या महोत्सवाचे उद्घाटन ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांच्या हस्ते होईल. पहिल्या दिवशी गुरुवारी दिवसभर बोली भाषा व संस्कृतीचे दर्शन घडवणारे कार्यक्रम सादर होतील. त्यानंतर बहिणाबाईंची गाणी व कवितांवर आधारित ‘अरे संसार संसार’ हा कार्यक्रम, बोहाडा (मुखवटा नृत्ये), दुपारी अहिराणी गीतांचा कार्यक्रम, झाडीपट्टी, आराधी लोकनृत्य आणि लोकगीते, तर सायंकाळी शिवशाहीर प्रवीण जाधव यांचा ‘जागर शिवबाचा’ कार्यक्रम होईल. रात्री 9 वाजता ‘शिकायला गेलो एक’ या नाटकाचा प्रयोग होईल.

वारकरी नाराज

संमेलन आयोजित करणाऱया राज्य शासनाला सामाजिक समरसतेची शिकवण देणाऱया संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज यांच्या संतपरंपरेचा सोयीस्कर विसर पडला आहे. निवृत्तीनाथ महाराज समाधी संस्थानने पत्राद्वारे पाठपुरावा करूनही याकडे आयोजकांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप विश्वस्त अमर ठोंबरे यांनी केला आहे. या संमेलनाकडे वारकरी पाठ फिरवतील, असेही त्यांनी सांगितले.