कोविड रुग्णांच्या सोबतीला पुस्तकरूपी मित्र, विश्वास ज्ञानप्रबोधिनीतर्फे महापालिकेकडे 300 पुस्तके सुपूर्द

531

नाशिक येथील विश्वास ज्ञानप्रबोधिनी, कुसुमाग्रज प्रतिष्ठान, ग्रंथ तुमच्या दारी यांच्या वतीने महापालिका आयुक्तांकडे कोविड रुग्णालयातील रुग्णांसाठी 300 पुस्तके सुपूर्द करण्यात आली. या कठीण काळात रुग्णांना पुस्तकरूपी मित्र मन आनंदी ठेवण्यासाठी, तसेच सकारात्मक दृष्टीकोन देण्यासाठी उपयुक्त ठरतील.

मराठी कथा, कादंबरी आणि ललित साहित्याची 300 पुस्तके नुकतीच कोविड रुग्णांसाठी महापालिकेला भेट देण्यात आली. ज्या रुग्णांना पुस्तक वाचनाची इच्छा आहे, त्यांना कोविड रुग्णालयात पुस्तके सहज उपलब्ध व्हावी म्हणून विश्वास ज्ञानप्रबोधिनीने हा उपक्रम राबविला आहे. त्यासाठी विश्वास ठाकूर यांनी पुढाकार घेतला. नुकतीच ही पुस्तके आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली आहेत. यावेळी विश्वास ठाकूर व ग्रंथ तुमच्या दारीचे शिल्पकार विनायक रानडे उपस्थित होते.

विश्वास ज्ञानप्रबोधिनी सातत्याने आरोग्यविषयक व समकालीन प्रश्नांचा वेध घेत सामाजिक जाणिवेतून वेळोवेळी उपक्रम राबवित असते. याचाच एक भाग म्हणून कोविड रुग्णांना पुस्तके उपलब्ध करून देण्यात आली आहेत. सेवाभावी वृत्तीने अनेक संस्था कोविड रूग्णांसाठी मदत करीत प्रशासनाच्या प्रयत्नांना अधिक बळ देत आहेत. त्यामुळेच ही लढाई आपण नक्की जिंकू. यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल विश्वास ज्ञानप्रबोधिनीचे आयुक्तांनी कौतुक केले. सोशल डिस्टन्सिंग पाळण्यासोबतच मन आनंदी ठेवण्यासाठी पुस्तकांसारखा दुसरा मित्र नसल्याचे विश्वास ठाकूर यावेळी म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या