नाशिक- कोविड रूग्णांसाठी 14 खासगी रूग्णालयातील सर्व बेड आरक्षित

612
प्रातिनिधिक

कोविड विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेत नाशिक महापालिकेने 14 खासगी रूग्णालयातील 100 टक्के म्हणजे एकूण 630, तर इतर 25 रुग्णालयातील 511 बेड आरक्षित केले आहेत. हेल्पलाईन कार्यान्वित करीत सर्व बेडचे योग्य नियोजन करण्यासाठी सीबीआरएस संगणकीय प्रणालीची मदत घेण्यात येत आहे.

खासगी रूग्णालयाकडून होणाऱ्या अवाजवी बिल आकारणीवर अंकुश ठेवण्यासाठी काही दिवसांपासून लेखापरिक्षण विभागामार्फत कोविड, तसेच नॉनकोविड रूग्णालयातील सर्व रूग्णांच्या बिलांची पूर्व छाननी सुरू आहे. महापालिका रुग्णालयातील खाटांची संख्याही वाढविण्यात आली असून, 14 खाजगी रुग्णालयातील शंभर टक्के 630 बेड कोविड रूग्णांसाठी आरक्षित करण्यात आले आहेत. अंशतः आरक्षित 25 रुग्णालयातील 511 बेड उपलब्ध केले आहेत. हे बेड रुग्णांना देण्याचे नियोजन करण्यासाठी सेंट्रलाइज बेड रिझर्व्हेशन सिस्टीम ही संगणक प्रणाली तयार करण्यात आली असून, याद्वारे रुग्णालयात भरती झालेले रुग्ण व रिक्त बेड संख्या यांची अचूक माहिती प्राप्त होणार आहे. कोरोनाबाधित रुग्णांना रूग्णालयाची गरज असल्यास महापालिकेच्या 9607623366 या क्रमांकावर फोन केल्यास रूग्णांच्या लक्षणांनुसार त्यांना रुग्णालय व बेड क्रमांक निर्धारित करण्यात येईल. ही हेल्पलाईन पूर्णवेळ सुरु राहणार आहे. संबंधित सर्व माहिती संगणक प्रणालीमध्ये वेळोवेळी नोंदवली जाईल.

कोविडसाठी पूर्णपणे आरक्षित रुग्णालय, अंशत: आरक्षित रुग्णालय व महापालिका रुग्णालयांची यादी व रूग्णालयनिहाय बेडची संख्या ही माहिती www.nashikcorporation.gov.in येथे उपलब्ध आहे. महापालिकेने आजपासून हेल्पलाइन कार्यान्वित केली आहे. त्याद्वारे नागरिकांना आवश्यक माहिती मिळणार आहे. हेल्पलाईन क्रमांक पुढीलप्रमाणे : खासगी हॉस्पिटलमध्ये बेड आरक्षित करण्यासाठी – 9607623366; कोरोनाविषयक माहितीसाठी – 9607432233, 0253-2317292; खासगी हॉस्पिटलच्या बिलासंदर्भात तक्रारीसाठी- ९६०७६०११३३.

आपली प्रतिक्रिया द्या