इम्रान खान यांनी भलत्या विषयावर बोलू नये! नसिरुद्दीन शाह यांनी फटकारले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

अल्पसंख्याकांच्या सुरक्षेबाबत अभिनेते नसिरुद्दीन शहा यांनी केलेल्या वक्तव्याचे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी शनिवारी समर्थन केले. एवढेच नव्हे तर या विषयाचा संबंध बॅरिस्टर जीना आणि पाकिस्तानशी लावला. यावरून नसिरुद्दीन शहा भडकले आहेत. त्यांनी इम्रान खान यांना भलत्याच विषयात पडू नये असा सल्ला दिलाय. तसेच आम्ही गेल्या 70 वर्षांपासून लोकशाहीत राहतोय. आपली काळजी कशी घ्यायची हे आम्ही जाणतो, असे सांगत शहा यांनी इम्रान खान यांना फटकारले आहे.

हिंदुस्थानात समाजमनात विष पेरलं गेले आहे. माणसाच्या हत्येपेक्षा गाईच्या हत्येला महत्त्व देण्यात आले असून मला माझ्या मुलांच्या सुरक्षेची चिंता वाटू लागली आहे, असे वक्तव्य अलीकडेच नसिरुद्दीन यांनी केले होतं. त्यावर इम्रान खान यांनी लाहोरच्या कार्यक्रमात वक्तव्य केले. या गोष्टी पाकिस्तानचे निर्माते मोहम्मद अली जीना यांना आधीच माहीत होत्या. म्हणूनच त्यांनी वेगळ्या पाकिस्तानची मागणी केली. अल्पसंख्याकांना सुरक्षित वाटावं म्हणून आमचं सरकार प्रयत्न करणार आहे. अल्पसंख्याकांना कशी वागणूक देतात हे नरेंद्र मोदी सरकारला दाखवून देऊ, असे वक्तव्यही खान यांनी केले.

इम्रान खान यांचे वादात उडी घेणे नसिरुद्दीन यांना आवडले नाही. त्यांनी पलटवार करीत खान यांना सुनावले की, मिस्टर खान यांनी त्याच मुद्द्यावर बोलावं जे त्यांच्या देशाशी संबंधित आहेत. ज्या विषयाशी संबंध नाही त्यावर बोलू नये.