गुन्हेगाराची ओळख पटवणे सहज शक्य

442

देशातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी केंद्र सरकार ‘चेहरा ओळख प्रणाली’ (फेशियल रिकग्नायझेशन सिस्टीम) विकसित करीत आहे. ही जगातील सर्वात मोठी यंत्रणा असून याद्वारे अट्टल गुन्हेगाराची ओळख पटवणे सहज शक्य होणार आहे. या प्रणालीच्या सहाय्याने सीसीटीव्ही कॅमेऱयाच्या नेटवर्कवरून मिळणारे आरोपीचे फोटो क्रिमिनल रेकॉर्डस्शी लिंक केले जाणार आहेत. आंध्र प्रदेश आणि पंजाब सरकारने 2018 मध्येच ही ‘चेहरा ओळख प्रणाली’ अवलंबली आहे.

नॅशनल क्राईम रेकॉर्डस् ब्युरोने या तंत्रज्ञानासंदर्भातील माहिती जाहीर केली आहे. गुन्हेगारांचे फोटो, त्याच्या पासपोर्टवरील फोटो आणि महिला व बालकल्याण विभागाकडून मिळालेल्या फोटोंचा या ‘चेहरा ओळख प्रणाली’त समावेश करण्यात आला आहे. याद्वारे गुन्हेगाराची ओळख पटविण्यासाठी सर्व स्तरांतून मिळणाऱया फोटो इमेजची मदत घेतली जाणार आहे. हे तंत्रज्ञान काळ्या यादीत असलेल्या गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी फायदेशीर ठरणार आहे.

फोटो जुळल्यावर अलर्ट मिळणार

गुन्हेगाराचा फोटो ओळखून आल्यावर या तंत्रज्ञानाकडून अलर्ट मिळणार आहे. या तंत्रज्ञानात मोबाईल डिव्हाईसही जोडण्यात आले असून गर्दीच्या ठिकाणी एखादा चेहरा कॅप्चर करणे शक्य होणार आहे, पण देशातील सीसीटीव्ही कॅमेऱयांची कमतरता हा प्रोजेक्ट पूर्ण होण्यामागील प्रमुख अडचण आहे. सध्याच्या घडीला देशात एक हजार व्यक्तीमागे केवळ 10 सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. याउलट शांघाय आणि लंडनमध्ये हे प्रमाण अनुक्रमे 113 आणि 68 इतके आहे.

सीसीटीव्ही कॅमेऱयांची कमतरता

सायबर सिक्युरिटी क्षेत्रातील शिवराम कृष्णन यांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्र सरकारसोबत हा प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी अनेक कंपन्या उत्सुक असून कंपन्यांकडून निविदा मागविण्यात येत आहेत. अनेक विदेशी कंपन्यादेखील यात सहभागी झाल्या आहेत. पुढील आठ महिन्यांत हे तंत्रज्ञान विकसित करण्यावर सरकारचा भर असेल.

आपली प्रतिक्रिया द्या