
ऑस्ट्रेलियात ख्रिसमसपूर्वी ज्यूंवर पुन्हा हल्ला
ऑस्ट्रेलियामध्ये ख्रिसमसच्या पहाटेच पुन्हा एकदा ज्यू समुदायाला लक्ष्य करण्यात आले. मेलबर्न येथे एका रब्बीच्या कारवर ‘फायर बॉम्बिंग’ करून ती जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. पंतप्रधान अँथनी अल्बनीज यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला असून हे एक ज्यू-विरोधी कृत्य असल्याचे म्हटले आहे. या हल्ल्याचा सेंट किल्डा ईस्ट पोलीस तपास करत आहेत. रब्बी कुटुंबाला सुरक्षित स्थळी नेण्यात आले आहे. ही घटना अशा ठिकाणी घडली आहे जिथे समोरच एक ज्यू शाळाही आहे. या हल्ल्यामुळे स्थानिक ज्यू समुदायामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलिसांनी संशयिताची ओळख पटवली आहे.
वेळेवर उपचार न मिळाल्याने हिंदुस्थानीचा कॅनडात मृत्यू
कॅनडा येथील एडमोंटन येथे 44 वर्षीय प्रशांत श्रीकुमार या हिंदुस्थानी व्यक्तीला वेळीच उपचार न मिळाल्याने त्याचे हृदयविकाराने मृत्यू झाला. ग्रे नन्स कम्युनिटी हॉस्पिटलमध्ये प्रशांत श्रीकुमार यांना आठ तास उपचाराच्या प्रतीक्षेत रहावे लागेल, असा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला. कॅनडात अकाऊंटंट म्हणून काम करणाऱया प्रशांत यांच्या छातीत दुखू लागले. त्यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, तिथे त्यांना इमर्जन्सी रूममध्ये वाट पाहण्यास सांगण्यात आले. अनेक तास उलटून गेले तरी त्यांना तपासायला कुणी आले नाही. अशातच वेदनेने ते खाली कोसळले आणि त्यांचा मृत्यू झाला. प्रशांत यांच्या पत्नीने हॉस्पिटलवर बेपर्वाईचा आरोप केला आहे. प्रशांत यांनी तीन लहान मुले आहेत.
नव्या वर्षात 15 दिवस ट्रेडिंगला सुट्टी
गुंतवणूकदारांना नवीन वर्षाचे नियोजन करता यावे यासाठी एनएसईने वर्ष 2026 मधील सार्वजनिक सुट्टय़ांची अधिकृत यादी जाहीर केली आहे. एनएसईने जाहीर केलेल्या कॅलेंडरनुसार आगामी 2026 सालात एकूण 15 दिवस ट्रेडिंग बंद राहणार आहे. याव्यतिरिक्त दर शनिवार आणि रविवारी साप्ताहिक सुट्टी असेल. 2025 आता आपल्या अंतिम टप्प्यात आले आहे. गुरुवार, 25 डिसेंबर रोजी ख्रिसमसनिमित्त शेअर बाजारात वर्षातील शेवटची ‘ट्रेडिंग सुट्टी’ होती.



























































