देशातून मॉन्सूनच्या परतीचा प्रवास सुरू झाला आहे. मात्र, हा परतीचा पाऊस महाराष्ट्रातच रखडल्याने राज्यात काही ठिकाणी परतीचा पाऊस मोठे नुकसान करत आहे.त्यातच आता हवामान खात्याने बळीराजाची चिंता वाढवणारे वृत्त दिले आहे. बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाची निर्मिती झाली असून त्याला ‘दाना’ असे नाव देण्यात आले आहे. या चक्रीवादळामुळे महाराष्ट्रावर पुन्हा एकदा अतिवृष्टीचे सावट आले आहे.
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या चक्रीवादळाला ‘दाना’ असे नाव देण्यात आले आहे. दाना चक्रीवादळामुळे पश्चिम बंगालच्या दक्षिण भागापासून ते दक्षिण हिंदुस्थानात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. हे चक्रीवादळ 24 ते 26 ऑक्टोबरदरम्यान पूर्वेकडील समुद्रकिनाऱ्यावर आदळण्याची शक्यता आहे. या चक्रीवादळाचा परिणाम हिंदुस्थानसह बांगलादेश आणि म्यानमारवरही होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
गेल्या काही दिवसांपासून सातत्याने पडत असलेल्या परतीच्या पावसामुळे महाराष्ट्रासह दक्षिण हिंदुस्थातीली जनजीवन विस्कळीत झाले आहे. चेन्नई, बंगळुरू, पाँडेचेरी आणि तिरुवनंतपुरम परिसरात मुसळधार पाऊस पडत आहे. या वादळाच्या परिणामामुळे पुढील दोन ते तीन दिवस तामिळनाडू, आंध्र प्रदेशचा किनारी भाग आणि ओदिशामध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या चक्रीवादळाचा परिणाम महाराष्ट्रावरही होणार आहे. कोकण आणि गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे महाराष्ट्रावर अजूनही पावसाचे सावट कायम आहे.