
मध्यरात्री झोपेत असताना डोक्यात गोळ्या झाडून भाजप नेत्याची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. धर्मसिंह कोरी असे हत्या झालेल्या भाजप नेत्याचे नाव आहे. कोरी यांची कुणी आणि कोणत्या कारणातून केली याबाबत पोलीस तपास करत आहेत.
उत्तर प्रदेशातील टीडौली येथे काल मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली. धर्मसिंह कोरी हे भाजपचे आंबेहटा मंडळाचे उपाध्यक्ष होते. सकाळी कोरी यांच्या सुनेने त्यांच्या खाटेजवळ रक्त पाहिले. यानंतर तिने आरडाओरडा केल्याने घरातील सर्व सदस्य धावत बाहेर आले. यानंतर हत्येचा उलगडा झाला. यानंतर पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. मध्यरात्रीच्या अडीचच्या सुमारास घराबाहेर फटाके फुटल्यासारखा आवाज आला. मात्र गावात दोन लग्न असल्याने तेथे फटाके फुटत असावे असे घरच्यांना वाटले, अशी माहिती कोरी यांचा मुलगा आणि भाजपचे अनुसूचित मोर्चा मंडळाचे अध्यक्ष सुनील कोरी यांनी सांगितले.




























































