टोल मागितला म्हणून कर्मचाऱ्याला बेदम मारहाण, कर्नाटकात भाजप नेत्याच्या मुलाची गुंडगिरी

कर्नाटकात एका भाजप नेत्याच्या मुलाने टोल प्लाझावर दादागिरी दाखवली. टोल मागणाऱ्या कर्मचाऱ्याला बेदम मारहाण केली. हा सर्व प्रकार टोल नाक्यावरील सीसीटीव्ही फुटेजमधून समोर आला आहे. कर्नाटकातील विजयपुरा-कलबुर्गी महामार्गावरील कन्नोलीला ही घटना घडली. भाजप नेत्याच्या मुलाला टोल फ्री ओलांडू देण्यास नकार दिल्याने टोल बूथ अटेंडंट करणाऱ्या कर्मचाऱ्याला भाजप नेत्याच्या मुलाने आणि त्याच्या मित्रांनी जबर मारहाण केली. या सीसीटीव्हीमध्ये भाजप नेत्याचा मुलगा व त्याचे मित्र टोल कर्मचाऱ्याला मारहाण आणि शिवीगाळ करताना दिसत आहेत. समर्थगौडा असे भाजप नेत्याच्या मुलाचे नाव आहे.

समर्थगौडा आणि त्याचे मित्र गाडीने प्रवास करत होते. जेव्हा त्यांना एका टोल बूथवर थांबवण्यात आले आणि टोल भरण्यास सांगितले, तेव्हा समर्थगौडा कर्मचाऱ्यांना म्हणाले, तुम्हाला माहिती आहे का मी कोण आहे? मी भाजप नेते विजयगौडा पाटील यांचा मुलगा आहे. टोल कर्मचाऱ्यांनी भाजप नेत्याला ओळखण्यास नकार दिला आणि विचारले, विजयगौडा कोण आहे? त्यानंतर समर्थगौडा आणि त्यांच्या मित्रांनी त्यांच्यावर हल्ला केला. परिस्थिती आणखी बिकट होऊ नये म्हणून इतर टोल कर्मचाऱ्यांनी हस्तक्षेप केला.