
बंगळुरूहून दिल्लीला जाणाऱ्या विमानात बॉम्बची धमकी देणारी चिठ्ठी सापडल्याने एकच खळबळ उडाली. विमानातील शौचालयात ही चिठ्ठी ठेवण्यात आली होती. यानंतर तात्काळ प्रवाशांना बाहेर काढत विमानाची तपासणी करण्यात आली. तपासणीत विमानात कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नाही.
इंडिया टीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर शनिवारी संध्याकाळी ही घटना घडली. विमानातील शौचालयात एका प्रवाशाला टिश्यू पेपरचा एक तुकडा सापडला. या पेपरच्या तुकड्यावर एक्सप्लोसिव्ह डिव्हाईस असं लिहिलं होतं. यानंतर वैमानिकाने तात्काळ एटीसीला याबाबत माहिती दिली. यानंतर पोलीस आणि बॉम्बशोधक आणि नाशक पथक घटनास्थळी दाखल झाले. तपासणीदरम्यान कोणतेही स्फोटक किंवा संशयास्पद वस्तू आढळली नाही. यानंतर संध्याकाळी उशिरा विमान बंगळुरूहून रवाना झाले आणि सुखरूप दिल्लीला पोहोचले. ही धमकीची चिठ्ठी कुणी ठेवली होती, याचा शोध घेण्यासाठी सुरक्षा यंत्रणा तपास करत आहेत.


























































