DRDO च्या गॅस टर्बाइन रिसर्च एस्टॅब्लिशमेंटला बॉम्बने उडवण्याची धमकी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

डीआरडीओ अंतर्गत येणाऱ्या गॅस टर्बाइन रिसर्च एस्टॅब्लिशमेंट या प्रयोगशाळेला ईमेलद्वारे बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. सोमवारी एकामागोमाग एक धमकीचे मेल प्राप्त झाले. यानंतर पोलिसांनी बॉम्ब निकामी पथक आणि अग्निशमन दलाच्या मदतीने संपूर्ण परिसर रिकामा करून कसून तपासणी केली. तपासणीत कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आली नाही.

एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, ‘Kiruthiha.udhayanidhi@hotmail’ या ईमेल आयडीवरून आलेल्या मेलमध्ये तामिळ भाषेत परिसरात स्फोटक उपकरणे पेरण्यात आल्याचा आणि दुपारी सुमारे दीड वाजता त्यांचा स्फोट होईल, असा दावा करण्यात आला होता. ई-मेल पाठवणाऱ्याने तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांचे नातू इन्बनिधी यांचे अपहरण करण्याचा इशाराही दिला होता.

आरोपीचा शोध घेण्यासाठी केंद्रीय गुन्हे शाखेने तपास तीव्र केला असून खबरदारीचा उपाय म्हणून शहरातील संरक्षण आस्थापनांमध्ये सुरक्षा वाढवण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.