
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले मोंथा चक्रीवादळ अखेर आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यावर धडकले आहे. हवामान विभागाने (IMD) सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर एका पोस्टमध्ये याची पुष्टी केली. हे वादळ पुढील काही तासांत कीनाडाजवळील मछलीपट्टनम आणि कलिंगपट्टनम दरम्यान आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यावरून जाईल. वाऱ्याचा कमाल वेग 90 ते 100 किमी प्रतितास असेल, जो ताशी 110 किमी पर्यंत वाढेल, असेही हवामान खात्याने नमूद केले.
ओडिसातील 15 जिल्ह्यांमध्ये जनजीवन विस्कळीत
मोंथा चक्रीवादळामुळे ओडिसात मुसळधार पाऊस सुरू झाला. पावसामुळे भूस्खलन झाले, अनेक घरांचे नुकसान झाले. तसेच किनारी आणि दक्षिणेकडील जिल्ह्यांमध्ये झाडे उन्मळून पडली. दक्षिण ओडिसातील 15 जिल्ह्यांमध्ये जनजीवन विस्कळीत झाले आहे.
दरम्यान, बाधित लोकांना आश्रय देण्यासाठी 2 हजाराहून अधिक चक्रीवादळ निवारागृहे स्थापन करण्यात आली आहेत. दक्षिणेकडील आठ जिल्ह्यांमध्ये संवेदनशील ठिकाणी 153 बचाव पथके तैनात करण्यात आली आहेत.
नऊ जिल्ह्यांमधील शाळा आणि अंगणवाडी केंद्रे 30 ऑक्टोबरपर्यंत बंद ठेवण्यात आली आहेत. तसेच सरकारी कर्मचाऱ्यांच्या रजाही 30 ऑक्टोबरपर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत. पर्यटक आणि स्थानिकांना समुद्रकिनाऱ्यांवर जाण्यापासून रोखण्यासाठी सर्व समुद्रकिनाऱ्यांकडे जाणारे मार्ग बंद करण्यात आले आहेत.




























































