धक्कादायक! यूट्युब पाहून शस्त्रक्रिया; नशेत डॉक्टरने महिलेची आतडी, नसा आणि अन्ननलिका कापली

यूट्युब पाहून महिलेची शस्त्रक्रिया केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शस्त्रक्रियेदरम्यान बोगस डॉक्टरने महिलेच्या महत्वाच्या नसा कापल्याने तिचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. घटनेनंतर आरोपी डॉक्टर फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

उत्तर प्रदेशातील बाराबंकी जिल्ह्यात ही घटना घडली. दफरापूर माजरा सैदानपूर गावातील तेह बहादूर रावत यांच्या पत्नीला काही दिवसांपासून पोटात वेदना होत होत्या. यामुळे कुटुंबीयांनी त्यांना उपचारासाठी श्री दामोदर औषधालय येथे नेले. तेथे तिची तपासणी केली असता क्लिनिक चालक ज्ञान प्रकाश मिश्राने तिला किडनी स्टोन असल्याचे सांगितले. तसेच ऑपरेशनसाठी 25 हजार रुपये फी सांगितली. महिलेच्या पतीने ऑपरेशनसाठी 20 हजार रुपये जमा केले.

महिलेला पतीने दिलेल्या तक्रारीनुसार, डॉक्टरांनी पत्नीला ऑपरेशनसाठी टेबलवर नेले तेव्हा डॉक्टर ज्ञान प्रकाश नशेत होता. तसेच त्याला वैद्यकीय क्षेत्राचे कोणतेही ज्ञान नसताना त्याने यूट्युबवर किडनी स्टोनच्या ऑपरेशनचा व्हिडिओ लावून शस्त्रक्रिया सुरू केली. नशेत डॉक्टरने महिलेचे छोटे आतडे आणि महत्वाच्या नसा कापल्या. यामुळे खूप रक्तस्राव झाल्याने महिलेचा मृत्यू झाला.

महिलेचा मृत्यू होताच डॉक्टर ज्ञान प्रकाश मिश्रा कुटुंबासह फरार झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत तपास सुरू केला. पोलिसांनी क्लिनिक सील केले आहे.