
उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे मोठी दुर्घटना घडली आहे. जिल्ह्यातील फाफामऊ येथे सोमवारी दुपारी एका शीतगृहाची भिंत अचानक कोसळली. या दुर्घटनेत 20 कामगार ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. स्थानिकांनी तात्काळ पोलीस आणि अग्निशमन दलाला घटनेची माहिती दिली. अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी दाखल होत बचावकार्य सुरू केले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या अपघातात 8 ते 10 कामगार जखमी झाले आहेत. पोलिसांनी अद्याप याला दुजोरा दिलेला नाही.
या दुर्घटनेमुळे परिसरात एकच गोंधळ उडाला. दुर्घटनेनंतर शीतगृहात अमोनिया वायूची गळती झाल्यामुळे बचाव आणि मदतकार्यातही अडचणी येत आहेत. दुर्घटनाग्रस्त शीतगृह समाजवादी पक्षाचे नेते, माजी आमदार आणि माजी मंत्री अन्सार अहमद यांच्या मालकीचे असल्याचे कळते. या शीतगृहामध्ये बटाटे साठवण्यात येत होते. येथे उत्तर प्रदेश, बिहार आणि इतर अनेक राज्यांतील शेकडो कामगार तिथे काम करत होते.
मिळालेल्या माहितीनुसार, घटनेच्या वेळी 110 हून अधिक कामगार या शीतगृहात काम करत होते. दुपारी जेवणानंतर कामगार विश्रांती घेत असताना 1 ते 2 वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. अपघातानंतर अमोनिया वायूची गळती झाल्याने श्वास घेण्यास त्रास होऊ लागला.
अनेक प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी उपस्थित असून 21 हून अधिक रुग्णवाहिका तैनात करण्यात आल्या आहेत. बचाव आणि मदत कार्यासाठी घटनास्थळी सहाहून अधिक जेसीबी मशीन तैनात करण्यात आल्या आहेत.

























































