जसबीर सिंग आणि ज्योती मल्होत्रा यांची आमने-सामने चौकशी होणार, हेरगिरीवरून पाकिस्तानचा पर्दाफाश होणार?

पहलगाम हल्ल्यानंतर हिंदुस्थान आणि पाकिस्तानमधील संघर्ष वाढला आहे. यामुळे एनआयए अ‍ॅक्शन मोडमध्ये आलं असून देशभरातील विविध भागातून अनेक हेरांना अटक करण्यात आली आहे. एनआयएकडून या हेरांची चौकशी सुरू आहे. नुकतंच पंजाबमधील मोगा येथून जसबीर सिंग याला अटक करण्यात आली. एनआयएकडून जसबीर सिंग आणि हिसारच्या ज्योती मल्होत्रा यांची आमने-सामने चौकशी करण्यात येणार आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, जसबीर सिंग आणि ज्योती मल्होत्रा हे दोघेही एकमेकांच्या संपर्कात होते. याशिवाय दोघेही पाकिस्तानी दूतावासात तैनात असलेले आयएसआय अधिकारी दानिश सोहेल, पाकिस्तानी पोलिसांचे निवृत्त उपनिरीक्षक उमर शहरयार आणि लाहोरमध्ये टूर आणि ट्रॅव्हल व्यवसाय चालवणारे नौशाबा (आयएसआय एजंट) यांच्याशी थेट संपर्कात होते. या तिघांनी जसबीर आणि ज्योतीची आयएसआय अधिकाऱ्यांशी ओळख करून दिली होती.

एनआयएकडे जसबीर आणि ज्योतीविरोधात भक्कम पुरावे आहेत. यामुळेच एनआयए ज्योती आणि जसबीर सिंग दोघांचीही चौकशी करून पुरावे गोळा करत आहेत. या पुराव्यांमुळे तपास संस्थांना पाकिस्तानच्या हेरगिरी प्रकरणाचा पर्दाफाश करण्यास मदत होईल.

आरोपी जसबीर सिंगने त्याच्या मोबाईलमधून अनेक संपर्क, चॅट आणि काही महत्त्वाची माहिती डिलीट केल्याचे तपासात असे दिसून आले आहे. डिलिट केलेल्या कंटेंटची माहिती मिळवण्यासाठी पोलिसांनी मोबाईल फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवला आहे. तसेच गेल्या काही दिवसांत आरोपी कुणाकुणाच्या संपर्कात होता याबाबतही तपास सुरू आहे.

आणखी पाच युट्यूबर्स पोलिसांच्या निशाण्यावर

ज्योती मल्होत्रा हेरगिरी प्रकरणानंतर हिसार पोलिसांनी तपास तीव्र केला आहे. अनेक सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आणि युट्यूबर्स पोलिसांच्या निशाण्यावर असून, ज्योतीच्या संपर्कात असलेल्या पाच सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आणि युट्यूबर्सना नोटिसा पाठवल्या आहेत. पाचही जणांना तपासात सामील होण्यासाठी बोलावण्यात आले आहे.