
लग्नाला चाललेल्या वऱ्हाडाच्या बसला भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. या अपघातात 9 जणांचा जागीच मृत्यू झाला असून 50 हून अधिक जखमी झाले आहेत. बसचा ब्रेक निकामी झाल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळते. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून काहींची प्रकृती चिंताजनक आहे. मृतांमध्ये पाच महिला आणि चार पुरूषांचा समावेश आहे.
छत्तीसगडमधील बलरामपूरमधील 90 वऱ्हाडी बसने झारखंडच्या लातेहार जिल्ह्यात लग्नाला चालले होते. ओरसा घाटीजवळ बसचे ब्रेक निकामी झाल्याने बस नियंत्रित झाली आणि पलटली. यात 9 जणांचा जागीच मृत्यू झाला तर 50 हून अधिक प्रवासी जखमी झाले. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
गंभीर जखमींना रांची येथील रिम्स रुग्णालयात रेफर करण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. अपघात नेमका कशामुळे झाला याबाबत तपास सुरू केला आहे.

























































