
उत्तर आणि दक्षिण ध्रुवानंतर जगातील सर्वाधिक बर्फाचा साठा असलेल्या हिंदूकुश हिमालयाच्या अस्तित्वाचा प्रश्न गंभीर बनला आहे. पृथ्वीचा तिसरा ध्रुव मानल्या जाणाऱ्या हिंदुकुश हिमालयातील हिमनद्या वितळण्याचा वेग दुप्पटीने वाढला आहे. यामुळे मोठा हाहाकार उडून तब्बल 2 अब्ज लोकांचा जीव धोक्यात असल्याची धक्कादायक शक्यता वर्तवण्यात आली आहे. ग्लोबल वॉर्मिंगच्या महासंकटाचे संकेत मिळत आहेत. 21 व्या शतकात हिमनद्या वितळण्याचे प्रमाण मागील काळाच्या तुलनेत अत्यंत चिंताजनक आहे. ‘आयसीआयएमओडी’च्या नवीन अहवालात या धोक्याबाबत सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
हिंदुकुश हिमालयाला पृथ्वीचा तिसरा ध्रुव म्हणूनही ओळखले जाते. येथे ध्रुवांव्यतिरिक्त बर्फाचे सर्वाधिक प्रमाण आहे. इथल्या हिमनद्यांनी याआधीही चिंतेत लोटले होते. मात्र नजिकच्या काळात संभावणारा धोका गंभीर स्वरुपाचा असल्याचे नव्या अहवालात म्हटले आहे. हिंदुकुश हिमालयात उगम पावणाऱ्या गंगा, ब्रह्मपुत्रा आणि सिंधू यांसारख्या नद्या आशियातील प्रमुख नद्यांपैकी आहेत. या नद्या अंदाजे दोन अब्ज लोकांना पाणी पुरवतात. जर हिमनद्या वेगाने वितळत राहिल्या, तर या नद्यांमधील पाण्याचा प्रवाह प्रथम वाढेल आणि नंतर लक्षणीयरीत्या कमी होईल. यामुळे भविष्यात तीव्र पाणीटंचाई निर्माण होऊ शकते, असेही अहवालात म्हटले आहे.
या प्रदेशात एकूण 63,700 हिमनद्या असून, त्या 55,782 चौरस किलोमीटर क्षेत्र व्यापतात. 1990 ते 2020 या केवळ 30 वर्षांच्या काळात हिमनद्यांचे 12 टक्के क्षेत्र नाहीसे झाले आहे. झपाट्याने वाढणाऱ्या तापमानामुळे 4,500 ते 6,000 मीटर उंचीवरील 78 टक्के हिमनद्यांना आता सर्वाधिक धोका निर्माण झाला असल्याचे अहवालात नमूद केले आहे.























































