राजस्थानच्या प्रसिद्ध कथावाचक साध्वी प्रेम बैसा यांचा संशयास्पद मृत्यू

राजस्थानमधील जोधपूर येथे खळबळजनक घटना समोर आली आहे. येथील प्रसिद्ध कथावाचक साध्वी प्रेम बैसा यांचा बुधवारी रात्री संशयास्पद मृत्यू झाला. साध्वी यांच्या मृत्यूनंतर राज्यात एकच खळबळ उडाली असून मृत्यूची सीबीआय चौकशीची मागणी होत आहे. बेशुद्धावस्थेत प्रेम बैसा यांना बुधवारी संध्याकाळी त्यांचे वडील वीरम नाथ आणि एका सहकाऱ्याने बोरनाडा आश्रमातून जोधपूर येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल नेले. जिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

साध्वी प्रेम बैसा वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले मात्र त्यांच्या शरीराची हालचाल होत नव्हती, असे रुग्णालयातील डॉक्टर प्रवीण जैन यांनी सांगितले. शवविच्छेदनासाठी मृतदेह सरकारी रुग्णालयात नेण्याकरिता रुग्णवाहिकेची व्यवस्था करण्यात येत होती. मात्र साध्वीचे वीरम नाथ यांनी रुग्णवाहिका घेण्यास नकार दिला आणि त्यांच्या खासगी गाडीतून मृतदेह घेऊन गेले, असेही डॉ. जैन यांनी पुढे नमूद केले.

प्रेम बैसा यांना बऱ्याच दिवसांपासून सर्दी आणि खोकल्याचा त्रास होता. त्यामुळेच आम्ही एका कंपाऊंडरला आश्रमात बोलावले होते. पण इंजेक्शन दिल्यानंतर पाचच मिनिटांत त्या बेशुद्ध झाल्या, असे त्यांच्या वडिलांनी सांगितले. कंपाऊंडरला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याची वैद्यकीय उपकरणे जप्त करण्यात आली आहेत.

मृत्यूनंतर चार तासांनी इंस्टाग्राम पोस्ट

साध्वी प्रेम बैसा यांच्या मृत्यूनंतर सुमारे चार तासांनी त्यांच्या सोशल मीडिया हँडलवरून एक पोस्ट टाकण्यात आली. या इंस्टाग्राम पोस्टमध्ये त्या आपल्या अनुयायांना अभिवादन करताना दिसत होत्या. “मी सनातनाच्या प्रचारासाठी प्रत्येक क्षण जगले आहे. माझ्या संपूर्ण आयुष्यात मला आदि जगद्गुरू शंकराचार्य, जगातील योगगुरू आणि पूज्य संत-महंतांचे आशीर्वाद मिळाले. मी आदि गुरू शंकराचार्य आणि देशातील अनेक महान संत-महंतांना पत्रे लिहून अग्निपरीक्षेची विनंती केली होती, पण निसर्गाच्या मनात काय होते? मी या जगाचा कायमचा निरोप घेत आहे, पण माझा देव आणि पूज्य संत-महंतांवर पूर्ण विश्वास आहे. माझ्या हयातीत नाही, तर माझ्या मृत्यूनंतर मला नक्कीच न्याय मिळेल,” असे त्या कॅप्शनमध्ये लिहिले होते.

साध्वीच्या वडिलांनी दुजोरा देत ती पोस्ट तिच्या मोबाईलवरून शेअर करण्यात आल्याचे सांगितले. “एका सहकारी गुरु महाराजांनी तो संदेश पाठवला होता,” असे ते म्हणाले. त्यांनी साध्वीच्या मृत्यूच्या चौकशीची मागणीही केली आहे.

साध्वी प्रेम बैसा यांचा व्हायरल व्हिडिओ

प्रेम बैसा आणि तिचे वडील गेल्या वर्षी एका वादामुळे चर्चेत आले होते. एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये ती एका खोलीत त्यांना मिठी मारताना दिसली होती. त्या क्लिपमध्ये दुसरी एक महिला खोलीत येऊन एक ब्लँकेट काढून बाहेर जातानाही दिसत होती. साध्वीने याला प्रेमाची अभिव्यक्ती म्हटले होते.

हा व्हिडिओ वडील आणि मुलीच्या नात्याला बदनाम करण्याचा प्रयत्न असल्याचे साध्वीने म्हटले होते. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला आणि व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी एका व्यक्तीला अटक केली.