
समुद्राच्या पाण्याचे गोड्या पाण्यात रूपांतर करण्यात संरक्षण संशोधन आणि विकास संस्थाच्या (डीआरडीओ) संशोधकांना यश आलंय. संशोधकांनी समुद्राचे खारे पाणी गोड्या पाण्यात रूपांतरीत करण्यासाठी नॅनोपोर्स मल्टीलेयर्ड पॉलिमर मेम्ब्रेनचा शोध लावला आहे. आठ महिन्यांच्या अथक प्रयत्नांतून हे यश गवसलंय. समुद्राच्या पाण्याचे गोड्या पाण्यात रूपांतर करण्याची ही एक पद्धत आहे. याचा फायदा पाण्याची टंचाई असलेल्या भागांसह तटरक्षक दलालाही होणार आहे. कानपूर येथील डीआरडीओच्या डिफेन्स मटेरियल स्टोअर्स आणि रिसर्च अँड डेव्हलपमेंट लॅबमध्ये हे तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे. यामध्ये नॅनोपोर्स बहुस्तरीय पॉलिमर पडदा आहे, जो खारे पाणी शुद्ध करताना त्यातील खारट तत्त्वे बाजूला करतो. डीआरडीओच्या या संशोधनाला हिंदुस्थानच्या तटरक्षक दलाचे सहाय्य लाभले आहे.
आणखी चाचण्या आवश्यक
सध्या तटरक्षक दलाच्या जहाजांवर प्रायोगिक स्तरावर या मेम्ब्रेनचा वापर केला जात आहे. या चाचणीचे समाधानकारक निकाल आले आहेत. असे असले तरी तटरक्षक दलाला या तंत्रज्ञानाच्या वापराला परवानगी मिळविण्यासाठी 500 तासांच्या ऑपरेशनल चाचणीतून जावे लागणार आहे. सध्यातरी हे तंत्रज्ञान तटरक्षक दलापुरतेच केंद्रित असले तरी भविष्यात किनारी भागात राहणाऱ्या लोकांसाठी खूप फायदेशीर ठरू शकते.
काय होते आव्हान
तटरक्षक दलाच्या जहाजांवर खाऱ्या पाण्यासाठी डिसॅलिनेशन प्लांट वापरले जातात. खाऱ्या पाण्यात असलेल्या क्लोराइड आयनमुळे या मेम्ब्रेनची स्थिरता कायम राखणे कठीण जाणार होते. डीआरडीओने या दिशेने नवीन संशोधन करून टिकाऊ मेम्ब्रेन विकसित केले आहे.