
बदलती जीवनशैली, फास्टफूडचे अतिसेवन अशा विविध कारणांमुळे हल्ली तरुणांमध्ये लठ्ठपणाची समस्या वाढत आहे. या समस्येवर उपाय करण्यासाठी अनेक जण सोशल मीडियाची मदत घेतात. मात्र सोशल मीडियावर सुचवलेले हे उपाय कधी कधी जीवावर बेततात. अशीच एक घटना तामिळनाडूतील मदुराईत समोर आली आहे. युट्यूबवर व्हिडिओ पाहून वजन कमी करण्यासाठी केमिकलचे सेवन केल्याने काही तासांतच 19 वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, मदुराईतील मीनंबलपुरम येथील रहिवासी कलैयारासी (19) ही तरुणी वाढत्या वजनाबाबत चिंतेत होती. वजन कमी करण्यासाठी तिने YouTube वर उपाय शोधला. युट्यूबवर एका व्हिडिओत बोरॅक्स (सोडियम बोरेट) चे सेवन केल्यास वजन जलद गतीने कमी होते असा दावा करण्यात आला होता. हा व्हिडिओ पाहून झटपट वजन कमी करण्यासाठी तरुणीने दुकानातून बोरॅक्स (सोडियम बोरेट) आणि सेवन केले.
केमिकलचे सेवन केल्यानंतर काही वेळातच तिला उलट्या आणि अतिसार होऊ लागला. कुटुंबियांनी तिला तात्काळ रुग्णालयात नेले. तेथे प्राथमोपचारानंतर तिला घरी सोडण्यात आले. मात्र, संध्याकाळपर्यंत तिची प्रकृती अधिकच बिकट झाली. अशक्तपणा आणि सतत उलट्या होत असल्याने तिला रात्री सरकारी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. याप्रकरणी तरुणीच्या वडिलांच्या फिर्यादीनुसार पोलिसांनी संशयास्पद मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.
तज्ज्ञांच्या माहितीनुसार, बोरॅक्स (सोडियम टेट्राबोरेट) हे घरगुती स्वच्छता करण्यासाठी, कपडे धुण्याचे डिटर्जंट आणि कीटकनाशकांमध्ये वापरले जाते. मानवी शरीरासाठी ते विष म्हणून काम करते. याचे सेवन खाल्ल्याने मूत्रपिंड निकामी होऊ शकते, तसेच अंतर्गत अवयव जळू शकतात आणि विषबाधा होऊ शकते. यामुळे अनेकदा थेट मृत्यू होतो.



























































