
कोलकात्यात बलात्काराच्या घटना वाढतच चालल्या आहेत. दम दम परिसरात आणखी एक बलात्काराची घटना समोर आली आहे. ट्यूशनला जाण्यासाठी घराबाहेर पडलेल्या 14 वर्षाच्या मुलीवर तिघांनी सामूहिक बलात्कार केला. याप्रकरणी तीन आरोपींवर गुन्हा दाखल करत त्यांना अटक करण्यात आली आहे. पीडिता आरोपींपैकी एकाला आधीपासून ओळखत होती.
सातवीत शिकणारी 14 वर्षांची मुलगी शनिवारी संध्याकाळी ट्युशनसाठी घरातून गेली. यानंतर आरोपींपैकी एका असलेल्या ओळखीच्या तरुणासोबत काही वेळ पार्कमध्ये बोलत होती. यावेळी तेथे आणखी दोन आरोपी आले आणि तिघांनी मुलीला बळजबरीने रिक्षात मोतीलाल कॉलनीतील एका घरात नेले. तेथे तिच्यावर सामूहिक बलात्कार केला.
मुलीने कशीबशी तेथून सुटका करत पळ काढला आणि घर गाठले. घरी आल्यानंतर मुलीने पालकांना घडला प्रकार सांगितला. यानंतर पालकांनी पोलीस ठाणे गाठत फिर्याद नोंदवली. पोलिसांनी तीनही आरोपींविरोधात लैंगिक गुन्ह्यांपासून बाल संरक्षण (POCSO) कायदा आणि भारतीय न्याय संहिताच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल केला.
तिघांनाही अटक करण्यात आली आहे. संजू साहा, विकी पासवान आणि राजेश पासवान अशी आरोपींची नावे आहेत. साहा याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे, तर अन्य दोन आरोपींना एक दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.


























































