वंदे भारत स्लीपर ट्रेन झाली अस्वच्छ

देशातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू होऊन अवघे काही तास उलटत नाहीत तोच ही ट्रेन अस्वच्छ करण्यात आली. या ट्रेनने प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी ट्रेनमध्ये कचरा टाकल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यासंबंधीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. देशात धावणाऱ्या राजधानी, मेल, एक्स्प्रेस, लोकल रेल्वेत प्रवाशांकडून स्वच्छता पाळली जात नाही. रेल्वे गाड्यांमध्ये बर्थपासून शौचालयपर्यंत अस्वच्छता आढळते. वंदे भारत स्लीपर ट्रेनचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते दोन दिवसांपूर्वीच उद्घाटन झाले होते. या ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी चहाचे कप, कागद, आईस्क्रीमचे कप, रॅपर्स कचऱ्याच्या डब्यात न टाकता रेल्वेच्या डब्यातच टाकले आहे. प्रवाशांच्या या वागण्यावर नेटिजन्सकडून प्रचंड रोष व्यक्त केला जात आहे. रेल्वे ही सार्वजनिक संपत्ती आहे. त्यामुळे रेल्वेची स्वच्छता ठेवणे हे प्रत्येक प्रवाशांचे कर्तव्य आहे, असे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.