लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना ईडीच्या चक्रव्यूहात अडकविण्याची तयारी केंद्रातील सत्ताधाऱ्यांकडून सुरू आहे. राहुल गांधी यांनीच यासंदर्भात ‘एक्स’वर पोस्ट करत ईडीकडून आपल्यावर छापा टाकण्याची तयारी सुरू केल्याचा दावा केला आहे.
टू इन वनला माझे चक्रव्यूह भाषण आवडले नाही हे जाहीर आहे. संसदेत दिलेल्या चक्रव्यूह भाषणानंतर ईडी आपल्यावर छापा टाकण्याची तयारी करत आहे. ईडीतील काही लोकांनी आपल्याला ही माहिती दिली. मी ईडीची वाट पाहत आहे. चहा, बिस्कीट माझ्याकडून त्यांना मिळेल, असे राहुल गांधी यांनी पहाटे दोनच्या सुमारास पोस्ट करत म्हटले आहे.
लोकसभेत केंद्रीय अर्थसंकल्पावरील भाषणावेळी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी चक्रव्यूहाचा संदर्भ देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्ला चढविला होता. देशातील शेतकरी, मजूर, तरुण घाबरलेले आहेत. कमळाच्या प्रतिकृतीवरून टीका करताना मोदी यांनी 21 व्या शतकात नवीन चक्रव्यूह बनविले असल्याचे म्हटले होते. या भाषणावरूनच आता आपल्यावर ईडी कारवाईची तयारी केली जात असल्याचा दावा राहुल गांधी यांनी केला आहे.
जे चक्रव्यूह बनविले आहे, त्यामुळे करोडो लोकांचे नुकसान झाले आहे. आम्ही त्या चक्रव्यूहाला तोडणार आहोत. ते तोडण्याचे सर्वात अस्त्र म्हणजे जातीय जनगणना आहे. यापासून तुम्ही सर्व घाबरत आहात. इंडिया आघाडी गॅरंटीने कायदेशीर एमएसपी पास करेल. याच सदनात आम्ही जाती जनगणना पास करून दाखविणार, असे राहुल गांधी म्हणाले होते.
राहुल यांच्यावर हल्ला होण्याची शक्यता!
राहुल गांधी हे लोकशाहीचा आवाज लोकसभेत बुलंद करत आहेत. मोदी आणि अमित शहा यांना राहुल गांधींनी आणि इंडिया आघाडीने सळो की पळो करून सोडले आहे. त्यामुळे राहुल गांधी आणि इंडिया आघाडीच्या आम्हा सगळ्यांच्या विरोधात एक कट रचला जातो आहे. हा कट इथे नाही तर परदेशात शिजत असून राहुल गांधी यांच्यावर हल्ला होण्याची शक्यता असल्याचे शिवसेना नेते, खासदार संजय राऊत म्हणाले.
माझ्यावर धाड टाकण्याचा प्लान आखला जात आहे हे ईडीतल्याच काही लोकांनी मला सांगितले आहे. मी ईडीच्या अधिकाऱ्यांची वाट पाहतोय… माझ्याकडून त्यांना चहा-बिस्कीट मिळेल.
अर्थसंकल्पावर काय केलं होतं भाष्य?
हजारो वर्षांपूर्वी कुरुक्षेत्रात अभिमन्यूला चक्रव्यूहात अडकवून सहा जणांनी मारले होते. चक्रव्यूहाचे दुसरे नाव पद्मव्यूह आहे, जे कमळाच्या फुलाच्या आकाराचे आहे. त्यात भीती आणि हिंसा आहे.
21 व्या शतकात एक नवे चक्रव्यूह निर्माण झाले आहे आणि तेही कमळाच्या फुलाच्या रूपात. पंतप्रधान मोदी हे चिन्ह छातीवर धारण करतात. जे अभिमन्यूचे केले गेले ते हिंदुस्थानसाठी केले जात आहे.
सहा जणांची टोळी संपूर्ण देशाला चक्रव्यूहात अडकवत आहे. हे सहा लोक म्हणजे नरेंद्र मोदी, अमित शहा, मोहन भागवत, अजित डोवाल, अदानी आणि अंबानी.
या चक्रव्यूहामुळे करोडो लोकांचे नुकसान होत आहे. आम्ही ते तोडणार आहोत. हे चक्र जातीय जनगणनेद्वारे खंडित केले जाईल. हे काम आम्ही पूर्ण ताकदीने करू.