राष्ट्रीय कुस्ती अजिंक्यपद स्पर्धा  – नरसिंग यादवचा चुरशीच्या लढतीत पराभव,

कोरोना महामारीमुळे तब्बल 10 महिने बंद असलेले क्रीडाक्षेत्र सुरू झाल्याने नोएडा येथील इनडोअर स्टेडियममध्ये राष्ट्रीय कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले आहे. या 65 व्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत 24 राज्यांतील 350 खेळाडू सहभागी झाले आहेत. मात्र  महाराष्ट्राचा अनुभवी मल्ल नरसिंग यादवला चुरशीच्या उपउपांत्यपूर्व फेरीत हार पत्करावी लागली.

राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत पहिल्यांदाच अनुभवी खेळाडूंचा फारसा दबदबा बघायला मिळाला नाही. 2016 च्या रियो ऑलिम्पिकपूर्वी डोपिंगमध्ये दोषी आढळल्याने नरसिंग यादववर चार वर्षांची बंदी घालण्यात आली होती.

बंदीची शिक्षा पूर्ण केल्यानंतर नरसिंग नव्या जोमाने आखाडय़ात उतरला होता, मात्र 74 किलो गटात त्याला आशियाई पदकविजेत्या गौरव बालियानकडून एका गुणाच्या फरकाने हार पत्करावी लागली. मात्र आशियाई सुवर्णपदक विजेत्या अमित धनखडने यूपीच्या गौरव बालियानचा पराभव करून कास्यपदकाला गवसणी घातली.

या वजनी गटात रेल्वेकडून खेळणाऱया पंजाबच्या संदीप सिंहने आशियाई पदकविजेत्या संदीपचा पराभव करून सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. याआधी तो 79 किलो गटात खेळायचा. 125 किलो गटात रेल्वेच्या सुमितने विजेतपद पटकावले.

नियमांचे उल्लघन; ‘डब्ल्यूएफआय’कडून नोटीस

राष्ट्रीय कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत कोरोना नियमांचे सर्रासपणे उल्लंघन झालेले बघायला मिळाले. एका लढतीदरम्यान रेल्वेच्या खेळाडूंनी थेट मॅटपर्यंत पोहोचून धिंगाणा घातला. या सर्वांना कोरोना नियमांचा विसर पडला होता.

हिंदुस्थान कुस्ती महासंघाचे (डब्ल्यूएफआय) अध्यक्ष बृजनभूषण शरण सिंह यांना हा गोंधळ थांबविण्यासाठी आखाडय़ात यावे लागले. या घटनेनंतर डब्ल्यूएफआयने रेल्वे स्पोर्ट्स बोर्डला कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल नोटीस पाठवून खुलासा मागितला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या