Job Recruitment Vacancy – राष्ट्रीयीकृत बँकांत 775 लिपिक पदासाठी नोकरभरती, भूमिपुत्रांना अर्ज करण्याचे स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाचे आवाहन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राष्ट्रीयीकृत बॅँकांत 775 लिपिक पदासाठी (क्लर्क) नोकरभरती करण्यात येणार आहे. या नोकरभरतीमध्ये जास्तीत जास्त भूमिपुत्रांची निवड व्हावी म्हणून स्थानीय लोकाधिकार समिती महासंघ प्रयत्नशील आहे. त्यामुळे या नोकरभरतीसाठी भूमिपुत्रांनी ऑनलाइनद्वारे www.ibps.in या संकेतस्थळावर गुरुवार, 21 जुलैपूर्वी अर्ज करावा, असे आवाहन स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाने केले आहे.

नोकरभरतीसाठी अर्ज करणाऱया उमेदवाराचे वय 1 जुलै 2022 पर्यंत सर्वसाधारण वर्गाकरिता 20 ते 28 पर्यंत असावे, तर आरक्षित प्रवर्गाकरिता कमाल वयोमर्यादा शासकीय नियमानुसार सवलत, शिथिलती असेल. मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर झालेला उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात. या परीक्षेकरिता जनरल, ओबीसी, ईबीसी उमेदवारांसाठी 850 रुपये अर्ज शुल्क तर एसी, एसटी, पीडब्ल्यूबीडी, ईएक्सएसएम उमेदवारांकरिता 175 रुपये शुल्क आहे. या पदांकरिता पूर्वपरीक्षा सप्टेंबर 2022 रोजी संबंधित यंत्रणेद्वारे ऑनलाइन घेतली जाईल.

महासंघाकडून प्रशिक्षण वर्ग

स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाचे अध्यक्ष, शिवसेना नेते–खासदार गजानन कीर्तिकर, कार्याध्यक्ष, शिवसेना नेते आनंदराव अडसूळ, सरचिटणीस, शिवसेना सचिव-खासदार अनिल देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली कोरोनाच्या धर्तीवर राज्य शासनाने घातलेल्या अटींचे पालन करून बँकेच्या नोकरभरतीपूर्व परीक्षेचे ऑनलाइन, ऑफलाइन प्रशिक्षण वर्ग महासंघ घेणार आहेत. अधिक माहितीसाठी शिवसेनाप्रणीत स्थानीय लोकाधिकार समिती महासंघ कार्यालय, शिवसेना भवन, दुसरा मजला, दादर येथे रविवार व सुट्टीचा दिवस वगळून सायंकाळी 6.30 ते रात्री 8.30 या वेळेत चिटणीस शरद एक्के – 9892699215, श्रीराम विश्वासराव – 9869588469, विलास जाधव – 9619118999, सुधाकर नर – 9867634856 यांच्याशी संपर्क साधावा, असे महासंघाचे चिटणीस व प्रशिक्षण वर्गप्रमुख उमेश नाईक यांनी कळवले आहे.