नाट्यगृहे सुरू करण्यासाठी सरकार सकारात्मक; एसओपी करणार!

देशात अनलॉक होत असताना सुरक्षा नियमावलीनुसार नाट्यगृहे सुरू करण्यास सरकारने परवानगी द्यावी, अशी नाट्य निर्मात्यांची मागणी आहे. यादृष्टीने नुकतेच मराठी नाटय़ व्यावसायिक निर्माता संघाने राज्य सरकारला ‘नमुना एसओपी’ सादर केला आहे. त्यावर सरकार सकारात्मक असून नमुना एसओपीतील मुद्दे विचारात घेऊन शासकीय एसओपी तयार केला जाणार आहे. तसेच यासंदर्भात सांस्पृतिक कार्यमंत्री अमित देशमुख रंगकर्मींची भेटही घेणार आहे.

निर्माता संघाने 15 सप्टेंबर रोजी सादर केलेल्या नमुना एसओपीच्या पार्श्वभूमीवर काल राज्याचे सांस्पृतिक कार्य मंत्री अमित देशमुख आणि नाटय निर्मात्यांची बैठक झाली. यावर हजारो कलाकार, तंत्रज्ञ आणि रंगमंच कामगार यांची रोजीरोटी असलेला नाटयव्यवसाय सुरक्षितपणे कसा सुरू करता येईल, यावर चर्चा झाली. नमुना एसओपीतील मुद्दे लक्षात घेऊन सांस्पृतिक कार्य सचिवांना शासकीय एसओपी तयार करण्याच्या सूचना अमित देशमुख यांनी दिल्या. या कामात निर्माता संघ आणि नाटय़ परिषद यांचा सहभाग असेल. यावेळी निर्माता संघाचे अध्यक्ष संतोष काणेकर, उपाध्यक्ष ज्ञानेश महाराव, प्रमुख कार्यवाह राहुल भंडारे आणि नाटय़ परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी उपस्थित होते.

  • नाटय़गृहे सुरू झाल्यावर पुढील दोन वर्षे तरी भाडेवाढ करू नये. एसओपीनुसार प्रेक्षक सीट्स कमी होणार असल्याने, त्याप्रमाणे नाटय़गृहाचे भाडे कमी करण्याच्या सूचना द्याव्या तसेच नाटयगृहांचे निर्जंतुकीकरणआणि प्रेक्षकांचे ’टेंपरेचर गन टेस्ट’ यंत्रणा उभारण्यासाची जबाबदारी नाटय़गृह व्यवस्थापनावर द्यावी, अशा निर्मात्यांच्या मागण्या आहेत.
  • येत्या 15 दिवसांत नाटय़ कलावंत संघ, रंगमच कामगार संघटना, नाटय़ व्यवस्थापक संघ या घटक संस्थांच्या पदाधिकाऱयांसोबत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे बैठक घेण्याचे आश्वासन अमित देशमुख यांनी दिले.

पुढची दीड वर्ष विशेष अनुदान द्यावे

नाटय़ व्यवसाय सावरण्यासाठी नाटय़गृहे सुरू झाल्यानंतर पुढील दीड वर्षे विशेष अनुदान योजना राबवावी. त्याअंतर्गत सरकारने नाटय् निर्माता किंवा नाटय़संस्थेने सादर केलेल्या नाटकाच्या पहिल्या 50 प्रयोगांना प्रत्येकी एक लाख रुपये अनुदान द्यावे, अशी मागणी निर्मात्यांनी सरकारकडे निवेदनाद्वारे केली.

सिनेमागृह चालकांशीही चर्चा

राज्यातील सिनेमागृहे आणि नाटय़गृहे सुरु करण्याबाबत सरकार सकारात्मक आहे. याबाबत आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करणार असल्याचे आश्वासन सांस्पृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी आज थिएटर्स ओनर्सनाच्या प्रतिनिधींना दिले. सध्या राज्यात अनलॉक- पाचवा टप्पा सुरु आहे. राज्य सरकारने जारी केलेल्या नव्या मार्गदर्शक तत्वानुसार हॉटेल, रेस्टॉरंट, बार सुरु करण्यास परवानगी दिली आहे. मात्र सिनेमागृहे व नाटय़गृहे बंद राहतील. दसरा, दिवाळी, नाताळ या काळात अनेक सिनेमे प्रदर्शित होतात त्यामुळे याच काळात सिनेमागृहांमध्ये प्रेक्षकांची गर्दी होते. सिनेमागृहांमध्ये येणाऱया प्रेक्षकांच्या आरोग्य सुरक्षेला प्राधान्य देत सिनेमागृहे सुरु कशी करता येतील याबाबत चर्चा करणार आहोत, असे अमित देशमुख म्हणाले.

बैठकीला सिंगल स्क्रिन ओनर्सपैकी उदय टॉकीजचे नितीन दातार, सेंट्रल सिनेमाचे शरद जोशी, कस्तुरबा सिनेमाचे निमिश सोमय्या, न्यू शिरीनचे विराफ वच्छा, आशा सिनेमाचे तेजस करंदीकर तर मल्टिप्लेक्स असोसिएशन ऑफ इंडियाचे दिपक अशेर, मल्टिप्लेक्स स्क्रिन ओनर्सचे आयनॉक्सचे अलोक टंडन, पीव्हीआरचे कमल ग्वानचंदानी, सिनेपॉलिसचे देवांद संपत, कार्निव्हलचे कुणाल सोहनी, सिटी प्राईडचे प्रकाश चाफलकर, युएफओचे कपिल अग्रवाल, राहूल हसकर, राम निधानी आदी उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या