
महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी प्रशासकीय फेरबदल करून उपायुक्तांच्या जबाबदाऱ्या बदलल्या आहेत. प्रथमच महापालिकेत विशेष कार्यकारी अधिकारी (ओएसडी) पदाची निर्मिती करून प्रसाद काटकर यांची नेमणूक करण्यात आली आहे. तसेच महापालिकेतील वादग्रस्त आणि गंभीर मुद्द्यांवर दोषी आढळलेले उपायुक्त माधव जगताप यांना मुख्य प्रवाहात आणल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या असून महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्या भूमिकेवरही संशय व्यक्त केला जाऊ लागला आहे.
महापालिक आयुक्त राम यांनी उपायुक्तांच्या बदल्या त्यांनी केल्या असून, तसेच सहाय्यक आयुक्त पदाच्या रिक्त जागांवर त्यांनी राज्य सरकारकडून प्रति नियुक्तीवर आलेल्या अधिकाऱ्यांची वर्णी लावली आहे. ओएसडी पद निर्माण करून प्रसाद काटकर यांच्याकडे जबाबदारी सोपविण्यात आली आहे. काटकर हे राज्य सरकारकडून प्रतिनियुक्तीवर आलेले अधिकारी असून, त्यांच्या ताब्यात निवडणूक विभाग कायम ठेवण्यात आला आहे. या पदामुळे त्यांची नियुक्ती वादग्रस्त ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अतिक्रमण विभागात फेरबदल केले असून उपायुक्त संदीप खलाटे यांच्याकडेच अतिक्रमण विभाग कायम ठेवण्यात आला आहे. तर मुख्य सुरक्षा अधिकारी रमेश शेलार यांना सहाय्यक अतिक्रमण निर्मूलन व अनधिकृत बांधकाम निर्मूलन विभाग प्रमुख म्हणून नेमण्यात आले असून ते खलाटे यांच्या अधीन काम करतील.
वादग्रस्त माधव जगताप पुन्हा मुख्य प्रवाहात
अतिक्रमण आणि कर विभागात काम पाहणारे माधव जगताप यांच्यावर पूर्वी शिस्तभंगाची कारवाई झाली होती. त्यांच्यावर अनेक गैरकारभार केल्याचे आरोप असून चौकशीत देखील गंभीर मुद्द्यांवर दोषी आढळले आहेत. त्यानंतर तत्कालीन आयुक्त राजेंद्र भोसले यांनी किरकोळ कारवाई करत त्यांना परिमंडळ एकची जबाबदारी देत मुख्य प्रवाहाबाहेर ठेवले होते. मात्र आता त्यांच्याकडे आकाश चिन्ह व परवाना विभाग, आपत्ती व्यवस्थापन आणि मंडई विभाग यांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. आजवर वरिष्ठांची मर्जी राखलेले जगताप यांनी पुन्हा जादू केल्याची चर्चा असून नवीन आयुक्त नवल किशोर राम देखील जगताप यांच्या जाळ्यात अडकल्याची चर्चा आहे.
नव्या जबाबदाऱ्या अशा
- निखिल मोरे (राज्य सरकारकडून प्रतिनियुक्ती) : भूसंपादन व व्यवस्थापन विभाग
- वसुंधरा बारवे : प्राथमिक, माध्यमिक, तांत्रिक शिक्षण व प्रशिक्षण प्रबोधिनी विभाग
- जयंत भोसेकर : समाजकल्याण विभाग (रिक्त पदाची जबाबदारी)
- रवी पवार (राज्य सरकारकडून प्रतिनियुक्ती) : वाहन व पर्यावरण विभाग
- अरविंद माळी : मध्यवर्ती भांडार
- कुणाल धुमाळ : ढोले पाटील क्षेत्रीय कार्यालय
- सोमनाथ आढाव : वारजे–कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालय
- सुचिता पानसरे : कोंढवा–येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालय
- राजेश गुर्रम (उपअभियंता) : येरवडा–कळस–धनोरी क्षेत्रीय कार्यालय