नवी मुंबईतील 514 पोलिसांच्या बदल्या

नवी मुंबई पोलीस दलातील 514 पोलीस कर्मचाऱयांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. या बदल्या मे महिन्यात होणार होत्या, मात्र कोरोना महामारी सुरू झाल्यामुळे त्या लांबणीवर पडल्या. बदल्या झालेल्या पोलीस कर्मचाऱयांमध्ये शिपाई, नाईक हवालदार आणि सहायक पोलीस उपनिरीक्षक यांचा समावेश आहे.

सहा वर्षांपासून अधिक काळ एकाच जागेवर काम करणाऱया पोलीस कर्मचाऱयांची बदली केली जाते. प्रत्येक वर्षी या बदल्या मे महिन्यात होतात, मात्र यंदा मार्चमध्येच कोरोना महामारी सुरू झाल्यामुळे नवी मुंबई पोलीस दलातील पोलीस कर्मचाऱयांच्या बदल्या रखडल्या होत्या. नवनियुक्त पोलीस आयुक्त बिपीनकुमार सिंह यांनी पदभार स्वीकारल्यानंतर या बदल्यांचा प्रश्न मार्गी लाबला आहे. एकूण 531 कर्मचाऱयांच्या बदल्या करण्यात येणार होत्या. मात्र त्यापैकी 15 कर्मचाऱयांच्या बदल्या स्थगित करण्यात आल्या आहेत.

क्रीमच्या जागेसाठी जोरदार फिल्डिंग

मे महिन्यामध्ये पोलीस दलातील प्रशासकीय बदल्या होणार असल्याने क्रीमच्या जागेसाठी अनेक कर्मचाऱयांनी जोरदार फिल्डिंग लावली होती. मात्र या बदल्या जवळपास चार महिने लांबणीवर पडल्या आणि नवीन आयुक्तांच्या कार्यकाळात अचानक झाल्या. त्यामुळे अनेक कर्मचाऱयांच्या आशा-अपेक्षांवर पाणी फेरले आहे.

अपुऱया मनुष्यबळामुळे ताण

नवी मुंबई पोलीस दलामध्ये अधिवारी आणि कर्मचारी असे साडेचार हजारांचे संख्याबळ आहे. सध्या सुरू असलेली कोरोना महामारी, शेकडो कर्मचाऱयांना झालेली कोरोनाची बाधा आणि 50 पेक्षा जास्त वय असलेल्या कर्मचाऱयांना दिलेली हलकी कामे यामुळे पोलीस दलावर कमालीचा ताण पडलेला असतानाच या बदल्या झाल्यामुळे या ठाण्यामध्ये आणखी भर पडली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या