१९ दिवसांत एक लाख प्रवाशांची पसंती; नवी मुंबई विमानतळाचा असाही रेकॉर्ड, साडेसातशे विमानांचे टेकऑफ, लॅण्डिग

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाने गेल्या १९ दिवसांत एक लाख प्रवाशांचा टप्पा पार केला आहे. या कालावधीत विमानतळावरून ७३४ विमानांचे टेकऑफ आणि लॅण्डिग झाले आहे. गेला सोमवार हा सर्वाधिक वर्दळीचा दिवस ठरला असून या दिवशी विमानतळावरून सुमारे साडेसात हजार प्रवाशांनी प्रवास केला आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रवासी सेवा २५ डिसेंबरपासून ख्रिसमसच्या मुहूर्तावर सुरू झाली. पहिल्याच दिवशी सुमारे पाच हजार प्रवाशांनी या विमानतळावरून प्रवास गेला. गेल्या १९ दिवसांत १ लाख ९ हजार ९१७ प्रवाशांनी विमानतळाचा वापर केला आहे. ज्यामध्ये ५५ हजार ९३४ प्रवाशांचे आगमन झाले असून ५३,९८३ प्रवाशांनी प्रस्थान केले आहे. १० जानेवारी विमानतळाचा वापर ७ हजार ३४५ प्रवाशांनी केला. त्यामुळे या दिवशीची सर्वाधिक व्यस्त दिवस म्हणून झाली आहे.

प्रवासी सेवा सुरू झाल्यांनतर १९ दिवसांच्या कालावधीमध्ये नवी मुंबई विमानतळाने ७३४ एअर ट्रॅफिक मुव्हमेंट्सचे व्यवस्थापन केले आहे. ज्यामध्ये ३२ जनरल एव्हिएशन एटीएमचा समावेश होता. यामधून नियोजित व जनरल एव्हिएशन ऑपरेशन्समध्ये वाढता वापर दिसून आला.

मालवाहतुकीसंदर्भात नवी मुंबई विमानतळाने २२.२१ टन कार्गोची हाताळणी केली आहे. सुरुवातीपासून प्रवासी व मालवाहतूक कनेक्टिव्हीटीसंदर्भात दिल्ली, गोवा व बेंगळुरू प्रमुख क्षेत्रे ठरली आहेत.

एकूण ४० हजार २६० आगमन बॅग्ज आणि ३८ हजार ७७४ प्रस्थान बॅग्ज प्रोसेस करण्यात आल्या, यामधून सामानाची कार्यक्षमपणे हाताळणी करण्याची क्षमता दिसून आली. बॅग्जची प्रोसेस झटपट होत असल्याने प्रवाशांनी समाधान व्यक्त केले.