नवी मुंबई विमानतळावर पाच दिवसांत 26 हजार प्रवाशांची मोहर; 162 विमानांचे लॅण्डिग, टेकऑफ

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर गेल्या पाच दिवसांत २६ हजार २१ प्रवाशांची मोहर उमटली आहे. त्यापैकी १२ हजार ४३१ प्रवासी या विमानतळावर उतरले असून १३ हजार ५९० प्रवाशांनी नवी मुंबईतून प्रवास केला आहे. ख्रिसमसच्या मुहूर्तावर २५ डिसेंबरपासून नवी मुंबई विमानतळावरून विमान सेवा सुरू झाली आहे. पहिल्या दिवशी ४ हजार ९२२ प्रवाशांनी या विमानतळावरून प्रवास केला होता. आता दिवसाला पाच हजार प्रवाशांचे या विमानतळावर स्वागत होत आहे.

नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन ८ नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झाले होते. त्यानंतर विमानतळ सीआयएसएफच्या ताब्यात गेले. सीआयएसएफने सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित केल्यानंतर ख्रिसमसपासून विमानतळावर प्रवासी आणि मालवाहतूक विमानांची सेवा सुरू झाली. गेल्या पाच दिवसांत सरासरी प्रत्येक दिवशी विमानतळावरून सुमारे पाच हजार प्रवाशांनी प्रवास केला. विकेंडला विमानतळ अक्षरशः हाऊसफुल्ल राहिले. शनिवारी ५ हजार ५४८ तर रविवारी ५ हजार ६१४ प्रवाशांनी विमानतळाचा वापर केला. ही प्रवासी संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे.

  • नवी मुंबई विमानतळाचे काम एकूण चार टप्प्यांत पूर्ण होणार आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यातील विमानसेवा सुरू झाली आहे. या टप्प्यात वर्षाला दोन कोटी प्रवासी हाताळण्याची क्षमता विमानतळाची आहे.
  • विमान सेवा सुरू झाल्यानंतर गेल्या पाच दिवसांत नवी मुंबई विमानतळावर २६ हजार २१ प्रवाशांचे स्वागत झाले आहे. त्यामध्ये विमानतळावर उतरणाऱ्या प्रवाशांपेक्षा विमानतळावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या जास्त राहिली आहे.
  • नवी मुंबई विमानतळाचे चारही टप्प्यांचे काम २०३६ पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. हे सर्वच टप्पे पूर्ण झाल्यानंतर विमानतळाची क्षमता वर्षाला ९ कोटी प्रवासी हाताळण्याची होणार आहे.

१३ शहरांसाठी विमान सेवा

नवी मुंबई विमानतळावरून सुरुवातीला १३ शहरांसाठी विमान सेवा सुरू करण्यात आली आहे. त्यामध्ये अहमदाबाद, बंगलुरू, चेन्नई, कोचिन, कोईम्बतूर, दिल्ली, गोवा, हैदराबाद, जयपूर, लखनौ, मंगलोर, नागपूर, बडोदा या शहरांचा समावेश आहे. जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यानंतर अन्य काही शहरांसाठी नवी मुंबईतून विमान सेवा सुरू होणार आहे. उड्डाणांची संख्याही वाढवली जाणार आहे. आंतरराष्ट्रीय विमान सेवा या विमानतळावरून येत्या मार्च महिन्याच्या अखेरीस सुरू करण्यात येणार आहे, असे विमानतळ व्यवस्थापनाने स्पष्ट केले आहे.