
इन्कम टॅक्स, सीबीआय, ईडीचे अधिकारी असल्याची बतावणी करून डिजिटल अरेस्टच्या नावाखाली लुटणाऱ्या टोळीवर नवी मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने अॅटॅक केला आहे. या टोळीतील तीन लुटारूंच्या गुन्हे शाखेने मुसक्या आवळल्या असून त्यांचा ऑनलाइन लुटमारीचा अड्डा उद्ध्वस्त केला आहे. नागरिकांच्या बँक खात्यावर अॅटॅक करण्यासाठी या टोळीने 10 बोगस कंपन्या सुरू करून त्यांच्या नावाने विविध बँकांमध्ये ३६ खाते उघडले होते. या टोळीकडून 11 लाख रुपयांची रोकड पोलिसांनी हस्तगत केली आहे.
नवी मुंबईतील एका महिला डॉक्टरला या टोळीने डिजिटल अरेस्टची भीती दाखवून त्यांच्याकडून 1 कोटी 81 लाख 72 हजार रुपये लुटले होते. लुटारूनीं त्यांना ईडी, सीबीआय आणि इन्कम टॅक्सच्या लेटरहेडवर बनावट नोटीस पाठवल्या होत्या. तुमच्या नावाने नवी दिल्ली येथील वाजीपूर येथे ग्लोबल ट्रेडिंग कंपनी असून या कंपनीचा 8 लाख 32 हजार इतका टॅक्स भरणे बाकी आहे. याप्रकरणी दिल्ली पोलिसांत तक्रार करण्यात आली आहे अशीही भीती त्यांना दाखवली. या गुन्ह्यात अटक टाळण्यासाठी त्यांना विविध बँक खात्यात पैसे भरण्यास सांगितले. त्यानुसार या महिला डॉक्टरांनी अनेक बँक खात्यात रक्कम जमा केली. मात्र नंतर या टोळीचा जाच वाढल्याने त्यांनी पोलिसांत तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी या टोळीतील तीन आरोपींची धरपकड केली.
आरोपींचा शोध घेण्यासाठी तीन पथके
डिजिटल अरेस्टच्या नावाखाली होत असलेल्या लुटीचे प्रकार वाढल्यानंतर याप्रकरणी पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, सहपोलीस आयुक्त संजय येनपुरे, अपर पोलीस आयुक्त दीपक साकोरे, पोलीस उपायुक्त अमित काळे यांनी गुन्हेगारांचा शोध घेण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या. त्यानुसार गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त अजयकुमार लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली तीन पथके तयार करण्यात आली. त्यांनी बँक खात्यांची सखोल चौकशी करून रमेश शेट, अमिश शाह आणि राजकुमार नारंग या तिघांवर झडप घातली.
परदेशातून व्हिडीओ कॉल
ही टोळी एखाद्या भागात गाळा भाड्याने घेऊन तिथे बोगस कंपनी सुरू करीत होती. या कंपनीच्या नावाने विविध बँकांमध्ये करंट अकाऊंट उघडले जात होते. इंटरनेट बँकिंगची सुविधा उपलब्ध करून घेतल्यानंतर इंटरनेट बँकिंग कीट, डेबिट कार्ट, मोबाईल सिमकार्ड परदेशात पाठवून देत. त्यानंतर संबंधित व्यक्तीला व्हिडीओ कॉल करून डिजिटल अरेस्ट भीती दाखवली जात होती. या आरोपींकडून एक लॅपटॉप, 18 बँकांचे चेकबुक, 18 विविध कंपन्यांचे मोबाईल, 32 बँकांचे डेबिट कार्ड आणि १० कंपन्यांचे बोगस रबरी स्टॅम्प हस्तगत करण्यात आले आहेत, असे सहाय्यक पोलीस आयुक्त अजयकुमार लांडगे यांनी सांगितले.