
नवी मुंबईत दुबार मतदारांचा शोध घेण्यासाठी महापालिका प्रशासनाने विशेष मोहीम हाती घेऊन झाडाझडती सुरू केली आहे. मतदारांना आपले नाव कोणत्या प्रभागात आहे हे शोधण्यासाठी महापालिकेच्या संकेतस्थळावर विधानसभा मतदारसंघनिहाय एक विंडो उपलब्ध करून देण्यात आली आहे. या विंडोच्या माध्यमातूनही दुबार नावांचा उलगडा होण्यास मदत होणार आहे. दुबार मतदारांचा शोध घेऊन त्यांची मार्क कॉपीमध्ये नोंद करण्यात येणार असून या मतदारांना एकाच ठिकाणी मतदान करू दिले जाणार आहे.
नवी मुंबई महापालिका क्षेत्रात सुमारे ७० हजार मतदार हे बोगस आणि दुबार आहेत. ही नावे मतदार यादीतून हटवण्यासाठी सर्वच स्तरातून मोठ्या प्रमाणात तक्रारी करण्यात आल्या आहेत. या तक्रारींची दखल घेऊन महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली दुबार नावांची झाडाझडती करण्यासाठी महापालिका प्रशासनाने एक विशेष मोहीम हाती घेतली आहे. दुबार नावांचा शोध घेण्यासाठी संगणक प्रणाली तयार करण्यात आली आहे. दुबार मतदारांच्या नावानुसार वर्गीकरण करण्यात आले आहे. दुबार मतदारांचे फोटो असलेली मतदार यादी बीएलओकडे देण्यात आली आहे. त्यानुसार बीएलओ हे प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून दुबार मतदारांचा शोध घेणार आहेत. बीएलओसोबत महापालिकेच्या कर्मचाऱ्यांचीही काम करणार आहेत. शहरातील सर्वच विभागांमध्ये मतदार मदत कक्ष सुरू करण्यात आला आहे. या कक्षामध्येही नागरिकांना आपले नाव कोणत्या मतदार यादीत आहे हे शोधता येणार आहे.
मतदार यादीत असलेले नाव ऑनलाइन शोधण्यासाठी महासेवा व्हॉटर लिस्ट हे संकेतस्थळ उपलब्ध करून देण्यात आले आहे. नाव, वडिलांचे नाव आणि अडनाव असे तीन रकाणे या संकेतस्थळावर आहेत. त्यामुळे मतदार यादीत नाव शोधणे सोपे झाले आहे.
महापालिका प्रशासनाने आपल्या संकेतस्थळावरही मतदारांच्या मदतीसाठी एक विडों तयार केली आहे. त्या विंडोचा आधार घेऊनही मतदारांना आपले नाव शोधता येणार आहे.
बीएलओ आणि पालिका कर्मचाऱ्यांनी केलेल्या सर्व्हमध्ये जर एखादा दुबार मतदार आढळून आला तर त्याची नोंद मार्क कॉपीमध्ये करण्यात येणार आहे. हा मतदार एकाच ठिकाणी मतदार करेल याची तंतोतंत काळजी घेण्यात येणार आहे.
सूचना, हरकतींचा पाऊस
नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रशासनाने प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केल्यानंतर या यादीवर हरकती आणि सूचनांचा अक्षरशः पाऊस पडला आहे. इच्छुक उमेदवारांनी खासगी सर्व्हे करून बोगस मतदारांचा पर्दाफाश केला आहे. या मतदारांची नावे यादीतून काढण्यात यावीत अशी मागणी करण्यात आली आहे. मात्र अनेक ठिकाणी ही मागणी गांभीर्याने घेतली जात नसल्याने इच्छुक उमेदवारांमध्ये नाराजी पसरली आहे.




























































