सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे यांचे प्रत्येक गोष्टीमध्ये काटेकोर नियोजन होते. त्या
आपली मुलगी सूची हिच्याबरोबर दिवसातून एकदा फोनवर न चुकता बोलत होत्या. दोन दिवसांच्या सुट्टीवर जायचे असले तरी त्या रजेचा अर्ज कार्यालयात जमा करून इमारतीचा सुरक्षारक्षक आणि घरात काम करणारी मोलकरीण यांनाही कल्पना देत होत्या. इतके काटेकोर नियोजन असताना त्या फक्त एसएमएस पाठवून सहा महिन्यांच्या रजेवर कशा जाऊ शकतात, असा सवाल विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी उपस्थित केला. अश्विनी बिद्रे हत्याकांडप्रकरणी विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांचा अंतिम युक्तीवाद सध्या पनवेल सत्र न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश के. जी. पालदेवार यांच्यासमोर सुरू आहे. अश्विनी यांनी त्यांची हत्या होण्यापूर्वी पंधरा दिवस अगोदर भाच्याच्या मुंजीला जाण्यासाठी दोन दिवसांची रजा टाकली होती. त्यासाठी त्यांनी रितसर रजेचा अर्ज भरून मुख्यालय सोडण्याची परवानगी वरिष्ठांकडून घेतली होती. अश्विनी यांच्याकडे घरकाम करणारी मोलकरीण आणि इमारतीचा सुरक्षारक्षक यांना त्यांनी तशी कल्पना दिली होती. मी फोन केल्यानंतरच कामाला ये असे त्यांनी मोलकरणील सांगितले होते. त्या प्रत्येक दिवशी मुलगी सूचीला फोन करत होत्या. भाऊ आनंव बिद्रे याच्याबरोबर त्यांचे वरचेवर बोलणे होत होते एवढे सर्व काटेकोर नियोजन असताना अश्विनी फक्त एसएमएस पाठवून सहमहिन्यांच्या सुट्टीवर कशा जाऊ शकतात. सहा महिने हिमालयात जाण्यासाठी त्यांनी कोणतीच कशी तयार केली नाही. असे प्रश्न प्रदीप घरत यांना
उपस्थित करून अश्विनी या मेडिटेशनसाठी हिमालयात गेल्या हा आरोप पक्षाचा दावा खोडून काढला.
हा एसएमएस कुरुंदकरनेच पाठवला
अभय कुरुंदकर याने अश्विनी यांची ११ एप्रिल २०१६ रोजी हत्या केली. त्यानंतर अश्विनी यांचा मोबाईल बंद झाला. तोपर्यंत दोघांच्या मोबाईलचे लोकेशन एकत्र होते. हा बंद झालेला मोबाईल पुन्हा १४ एप्रिल २०१६ रोजी सुरू झाला. याच मोबाईलवरून कुरुंदकर याने अश्विनीच्या नावाने मी मेडिटेशनसाठी सहा महिने जात आहे, माझी वाट बघू नका, असा एसएमएस पाठवला असे प्रदीप घरत यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले