
बेलापूर येथील शहाबाज गावात असलेल्या उड्डाणपुलाखाली झोपलेल्या एका 65 वर्षीय वृद्धाची माथेफिरूने दगडाने ठेचून हत्या केल्याची घटना आज पहाटे घडली. माथेफिरूने हल्ला केला तेव्हा स्थानिक नागरिक त्या ठिकाणी आले आणि त्यांनी त्याला पकडून बेदम चोपले. यात हा मारेकरी गंभीर जखमी झाला असून त्याला मुंबईतील जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अभिषेक पाल उर्फ अभिषेक रुद्रप्रताप सिंग असे आरोपीचे नाव आहे. तर प्रकाश लोखंडे असे मृत व्यक्तीचे नाव आहे. प्रकाश लोखंडे हे मूळ अकोला जिल्ह्यातील असून मिळेल ते काम करून गुजराण करत होते. शहाबाज गावात त्यांचे नातेवाईक राहत असल्याने तेथे त्यांचे येणे- जाणे होते. सीबीडी येथील शहाबाज गावात असणाऱ्या उड्डाणपुलाखाली शनिवारी रात्री नेहमीप्रमाणे झोपले होते. आज पहाटे साडेतीन चारच्या सुमारास अभिषेक पाल हा त्या ठिकाणी आला. लोखंडे जेथे झोपले तेथे तो गेला आणि जवळच पडलेला एक मोठा दगड घेऊन त्याने लोखंडे यांच्या डोक्यात दगड घातला. यातच त्यांचा मृत्यू झाला. या प्रकारामुळे आसपासचे लोक जागे झाले. त्यांनी अभिषेक याला पकडून बेदम मारहाण केली. या गोंधळाने शहाबाज गावातील लोकंही जागे होऊन येथे आले. त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन अभिषेकला बेदम चोपले. यात तो गंभीर जखमी झाला. त्याला वाशीतील प्रथम संदर्भ रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार त्याला मुंबईतील जे. जे. रुग्णालयात हलवण्यात आले आहे, असे सहाय्यक पोलीस आयुक्त मयूर भुजबळ यांनी सांगितले